भाजपचा सावध पवित्रा; काँग्रेसचे दार उघडे

By admin | Published: September 12, 2016 12:57 AM2016-09-12T00:57:18+5:302016-09-12T00:57:18+5:30

इचलकरंजी पालिका निवडणूक : पक्ष, आघाड्यांची मोर्चेबांधणीसाठी पूर्वतयारी सुरू; घडामोडींना वेग

BJP's cautious posture; Congress open doors | भाजपचा सावध पवित्रा; काँग्रेसचे दार उघडे

भाजपचा सावध पवित्रा; काँग्रेसचे दार उघडे

Next

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांनी सावध पवित्रा स्वीकारला आहे. भाजपने आपली भूमिका उघड केली नसली तरी कॉँग्रेसने मात्र इच्छुकांकडून उमेदवारी मागण्याची सर्वांना संधी ‘खुली’ केली आहे. सद्य:स्थितीला राजकीय पक्ष आणि आघाड्यांकडून मोर्चेबांधणीची पूर्वतयारी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
येथील नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पक्ष पातळीवर अधिकृतपणे लढण्याची परंपरा आहे. मात्र, कॉँग्रेसच्या विरोधात अन्य पक्षांची आघाडी करून निवडणूक लढविण्याची पद्धत १९९० नंतर अस्तित्वात आली. २०११च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रथमच स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले. त्यामुळे राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शहर विकास आघाडी असा तिरंगी सामना झाला. याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत एकही अपक्ष उमेदवार निवडून आला नाही, हे एक वेगळेपण ठरले. निवडणुकीमध्ये कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक निवडून आले.
नगरपालिकेमध्ये दोन्ही कॉँग्रेसची युती सत्तेवर अस्तित्वात आली. मागील वर्षी जानेवारी २०१५ मध्ये पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आणि त्यांच्या या बंडखोरीला ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. अशा २१ महिन्यांच्या कालावधीमध्ये नगरपालिकेतील पर्यायाने शहरातील राजकीय स्थितीवर मोठे परिणाम झाले. त्याचा परिपाक म्हणून आता मॅँचेस्टर आघाडी ही नवीन आघाडी उदयास आली. तर राष्ट्रवादीतील कारंडे गटाने शाहू आघाडी नावाने नवीन आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे नवीन आघाड्या स्थापन होऊन राजकीय पक्षांच्या तत्त्व व धोरणांना तिलांजली देण्यात आली आणि याचा आपोआपच राजकीय परिणाम व बदल नगरपालिका निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसणार आहे.
अशा पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या भाजपने निवडणूक आघाडीच्या चिन्हाऐवजी कमळाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. चालू निवडणुकीमध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची जागा ‘कमळ’ चिन्हावर लढविण्यात येणार आहे. तर पालिकेमध्ये असलेल्या एकूण ६२ नगरसेवकांच्या जागांपैकी सुमारे ४० जागा ‘कमळ’ चिन्हावर लढविण्याची तयारी सुरू केली आहे. तर आघाडीतील अन्य घटक पक्षांसाठी २२ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाने शनिवारी कॉँग्रेस कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन या बैठकीत पक्षाकडे उमेदवारी मागण्यास सर्वांना संधी देण्याची घोषणा केली आहे. या उमेदवारांसाठी फक्त पक्ष मानणारा एवढी एकच अट इच्छुकांसाठी घातली आहे. असे असले तरी भाजप व राष्ट्रीय कॉँग्रेस या दोन्ही पक्षांकडून मात्र आपले संपूर्ण पत्ते स्पष्टपणे उघडलेले नाहीत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)
जांभळे विरूद्ध कारंडे काटा लढत शक्य
मॅँचेस्टर आघाडीकडील पदाधिकारी व त्यांच्याकडे असणारे इच्छुक उमेदवार पाहता या निवडणुकीमध्ये ‘शविआ’ या आघाडीला दूर ठेवेल, असा राजकीय जाणकारांचा व्होरा आहे. त्याचप्रमाणे पूर्वी घोषित केल्यानुसार राष्ट्रीय कॉँग्रेस व जांभळे गट यांची युती होईल. तर ‘शविआ’ कडून कारंडे गटासाठी सात ते आठ जागा सोडल्या जातील. मात्र, याचा परिणाम म्हणून शहापूर व विक्रमनगरच्या परिसरात जांभळे गट विरूद्ध कारंडे गट अशी काटा लढत होईल, असेही राजकीय जाणकारांचे मत आहे.

 

Web Title: BJP's cautious posture; Congress open doors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.