भाजपची गुन्हेगारांनाच पसंती
By Admin | Published: October 20, 2015 11:44 PM2015-10-20T23:44:08+5:302015-10-21T00:09:32+5:30
विनायक राऊत : भाजप-ताराराणीच्या उमेदवारांवर डागली तोफ; दिशाभूल करणारा वचननामा
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी महायुतीच्या जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये अनेकजण गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे जगजाहीर असताना एकही मटकावाला, दारूवाला नाही, असे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महायुतीने जाहीर केलेला वचननामा हा जनतेची दिशाभूल करणारा व फसवा असल्याची टीका शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने महापालिकेत भ्रष्ट कारभार केला आहे, तर ‘गल्लीपासून दिल्ली’पर्यंत काँग्रेस संपली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर हेही प्रमुख उपस्थित होते.वसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी, ताराराणीला ‘मटका’ चिन्ह मिळणे आवश्यक होते, अशी केलेली बोचरी टीका ताराराणी-महायुतीच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर ‘ताराराणी’चे नेते सुनील कदम यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे उमेदवार दाखविण्याचे आव्हान केले होते. त्याला उत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, भाजप-ताराराणी महायुतीच्या नेत्यांना आपल्याकडे मटका, दारूवाला नाही हे सांगण्याची वेळ आली आहे. त्यांच्या उमेदवारांच्या यादीत दुधाळी पॅव्हेलियन, राजलक्ष्मीनगर, दौलतनगर, महालक्ष्मी मंदिर या प्रभागातील उमेदवार हे दारू, मटकावालेच आहेत. त्यांची पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांना माहीत नसली तर
त्यांनी ती पोलीस खात्याकडून मागवून घ्यावी. त्यांच्या माध्यमातून दहशत पसरविण्याचा व नगरसेवकांना निवडून आणण्याचा भाजप-ताराराणीचा केविलवाणा प्रयत्न सुरू असून, तो यशस्वी होणार नाही. कारण शिवसेनेच्या मागे स्वाभिमानी जनता आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजपसारख्या पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना फक्त आश्वासनांचीच खैरात केली आहे. ‘स्मार्ट सिटी’सह हजारो कोटींचा निधी आणण्याच्या विकासाचे गाजर दाखविले आहे; परंतु ठोस नियोजनाचा अभाव या जाहीरनाम्यात दिसतो, असेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्ट करभार केल्याची टीका केली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर टीका करताना ते म्हणाले, काँग्रेस पक्ष हा ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत’ संपलेला आहे. त्याला उभारी घेण्यासाठी किमान पन्नास वर्षांचा कालावधी जावा लागेल.
या पत्रकार परिषदेस आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमख संजय पवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमदार क्षीरसागर यांनी जाहीर केली यादीच...
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ‘टोलमुक्ती करणारच’ या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, रस्ते विकास महामंडळाचे मंत्रिपद शिवसेनेकडे असताना टोलमुक्तीची घोषणा करणारे तुम्ही कोण?
मटका-दारूवाले आपल्याकडे नाही म्हणणाऱ्या भाजप-ताराराणीचे नेते राजलक्ष्मीनगर प्रभागातील शोभा बामणे यांचे पती दत्तात्रय बामणे मटकावाले, महालक्ष्मी मंदिर प्रभागातील श्रृती पाटील यांचे पिता आर. डी. पाटील हे दारूवाले, दौलतनगर प्रभागातील विलास वास्कर हे मोक्काअंतर्गत कारवाई झालेले, तर दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातील हेमंत कांदेकर हे मारामारीचे गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे, अशी उमेदवारांची यादीच आमदार क्षीरसागर यांनी जाहीर केली.
राष्ट्रवादीचा पालिकेत खेळखंडोबा
गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने महापालिकेत खेळखंडोबाच केला आहे. त्यामुळे त्यांना ‘वचननामा’ प्रसिद्ध करण्याचा अधिकारच राहिलेला नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली. याशिवाय काँग्रेस संपली असल्याचे सांगताना काँग्रेसला उभारी मिळण्यासाठी पन्नास वर्षांचा कालावधी जावा लागेल, असेही सांगितले.