पक्षवाढीसाठी भाजपकडून जोर
By admin | Published: April 28, 2016 09:16 PM2016-04-28T21:16:21+5:302016-04-29T00:51:04+5:30
हातकणंगले तालुका : शिवसेनेला केले सावध, काँग्रेसला पाडले खिंडार
आयुब मुल्ला--खोची --भारतीय जनता पक्षाचा हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशानिमित्त पेठवडगाव येथे मेळावा झाला. हा कार्यक्रम स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तो शिवसेनेला सावध करणारा, तर काँग्रेसला धक्का देणारा होता. म्हणजे कार्यक्रमाचे निमित्त पक्षप्रवेशाचे, तर हेतू पक्षवाढीचा असल्याचे स्पष्ट झाले.
कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती म्हणजे याला पक्षीय राजकारणाचे अनेक संदर्भ होते. यावेळी डॉ. अशोक चौगुले यांच्यासह तालुक्यातील सुमारे सव्वाशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या कार्यक्रमाचे परिणाम वडगावपुरते मर्यादित नसणार आहेत, तर ते तालुकाभर परिणाम करणारे आहेत. या कार्यक्रमात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींचा सातत्याने उल्लेख झाला. स्थानिक कार्यकर्त्यांनी टीकेऐवजी विकासाची भूमिका मांडली, तर नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, अशी ग्वाहीही यावेळी नेत्यांनी दिली.
वडगावात राजकीय सभा झाली की, त्याचे रंग ग्रामीण भागात उमटतात ही वस्तुस्थिती आहे. परंतु, वडगावात यादव आघाडीच्या नेत्या नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्या रचनात्मक विकासाची घोडदौड पाहता निवडणुकीत किती फरक पडेल, हा येणारा काळच सांगेल, असे बोलले जाते. नगरपालिकेत अनेक वर्षांपासून यादव घराण्याची सत्ता आहे. त्याला शह देण्यासाठी भाजपचे पाठबळ चौगुले यांच्या पाठीशी उभे राहिले आहे, हे खरे आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांची गतीही पाहण्यात जनतेला रस आहे. हा झाला शहरापुरता मर्यादित भाग.
परंतु, इथल्या विधानसभा मतदारसंघावरही भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनाही या निमित्ताने सावधानतेचा इशारा भाजपने दिला आहे. सेना-भाजप युतीमुळेच मिणचेकर यांना आमदारकी मिळणे सोपे झाले होते. आता मात्र ऐक्य न झाले तर मतविभागणीचा सामना करावा लागणार आहे. भाजप येथील कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी ताकद देणार, हे निश्चित आहे. याचा उपयोग पक्षवाढीसाठी होणार आहे. काँग्रेसला तर हा कार्यक्रम धक्का देणारा आहे. सत्ता असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळच दिले नाही. कार्यकर्ता मोठा झाला, त्याला प्रतिष्ठेचे पद दिले, तर नेता मोठा होतो, पक्ष वाढतो, हा विसरच नेत्यांना पडला. आता तर हे सत्तेतच नाहीत, त्यामुळे या पक्षातील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. पक्षात गट-तट आहेत, अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती) लढविताना कसरत होणार आहे, हे लक्षात आल्याने काहीजण शांत बसूया, असेही बोलत आहेत.
मतविभागणी होण्याची शक्यता
सेना व भाजपने विधानसभेला स्वतंत्र उमेदवार दिले तर मात्र पूर्वीपासून असणाऱ्या युतीच्या मतांची विभागणी होईल. त्याचा फायदा काँग्रेसला होईल, याचा आनंद काँग्रेसला आहे. तीच स्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेत राहिली तरीही काँग्रेसला पोषक वातावरण राहील, असा अंदाज काँग्रेसवाले व्यक्त करीत आहेत.
या कार्यक्रमाने पक्षीय राजकारणाची बीजे रोवली आहेत. तसेच सेना आमदारांना सावध करीत काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट भाजपचे कार्यकर्ते मात्र उत्साही झाले आहेत.