शिरोळमध्ये भाजपला ‘अच्छे दिन’

By admin | Published: August 31, 2016 11:47 PM2016-08-31T23:47:23+5:302016-09-01T00:45:51+5:30

पालिका निवडणुकीत पडसाद उमटणार : पाच नेत्यांच्या प्रवेशाने बहुजन विकास आघाडीत फूट

BJP's 'good days' in Shirol | शिरोळमध्ये भाजपला ‘अच्छे दिन’

शिरोळमध्ये भाजपला ‘अच्छे दिन’

Next

गणपती कोळी-- कुरुंदवाड --शिरोळ तालुक्यातील पाच दिग्गज मंडळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात भाजपसाठी मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली असून, वर्षअखेरीस होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत याचे पडसाद दिसणार आहेत. तर दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या बहुजन विकास आघाडीत फूट पडली आहे.
तालुक्यात जवळपास सर्वच पक्ष असलेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी संघटना यांचे प्रामुख्याने वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेना, भाजप असा क्रम लागतो. स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांचा प्रश्न घेऊन वेळोवेळी यशस्वी आंदोलन केल्यामुळे त्यांच्या पाठीशी शेतकरी विशेषत: तरुण वर्ग राहिल्याने राजकारणातही त्यांना यश आले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा तालुका गत पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानीच्या बाजूने राहिला आहे. राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसचे साखर कारखाने, सहकारी संस्थांचे जाळे असल्याने या दोन्ही पक्षांची ठराविक फळी मजबूत आहे. तर शिवसेनेचा तरुण वर्ग असल्याने गेल्या अनेक वर्षात या पक्षाला नेतृत्व मिळाले नसले तरी कोणत्याही निवडणुकीत २० ते २२ हजार मते शिवसेनेची आहेत. त्यामानाने भाजप तालुक्यात नगण्यच आहे.
गत विधानसभा निवडणुकीत गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, विठ्ठलराव निंबाळकर-सरकार, ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे, सामाजिक कार्यकर्ते विजय भोजे, ‘गोकुळ’चे माजी संचालक दिलीप पाटील आदींनी तालुक्यात बहुजन विकास आघाडी स्थापन करून शिवसेनेची उमेदवारी मिळालेले उल्हास पाटील यांना निवडून आणले. त्यामुळे तालुक्यात आम्ही ठरवू तेच राजकारण होईल असा आभास या आघाडी नेतृत्वांना होता. मात्र तालुक्यातील जिल्हा बँक निवडणूक, विधानपरिषद निवडणूक, कुरुंदवाड नगरपरिषद पदाधिकारी बदलाच्या वेळी काहींनी टोकाची भूमिका घेतल्याने ही आघाडी एकसंघ नाही, हे निश्चितच होते.
केंद्रात व राज्यात भाजप सरकार असल्याने आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जि. प. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तालुक्यातील वजनदार नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न भाजपमधून होत आहे. त्यामध्ये प्रथम शिरोळ तालुक्यात त्यात यश आले असून, कुरुंदवाड शहरातील राजकीय वजनदार नेते विद्यमान नगरसेवक व जिल्हा धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अभिजित जगदाळे, विविध यशस्वी आंदोलन करणारे व स्टार प्रचारक म्हणून ओळखले जाणारे विजय भोजे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ बाळासाहेब पाटील, जयवंतराव जगदाळे यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने शिरोळ तालुक्यात राजकीय खळबळ उडवली आहे.


एका दगडात तीन पक्षी : वर्चस्व वाढविणार
तालुक्यात नेत्यांसाठी भाजपला अच्छे दिन आले असून नेत्यांची पहिली परीक्षा नगरपालिका निवडणुकीने होणार आहे. बहुजन विकास आघाडीत फूट पाडणे, राष्ट्रवादी व काँग्रेसला धक्का देणे व तालुक्यातील आपले राजकीय वर्चस्व वाढविणे अशी एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला आहे. या राजकीय खेळीत कितपत यशस्वी होतात, हे आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.

Web Title: BJP's 'good days' in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.