आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘कोल्हापूर पॅटर्न’
By admin | Published: May 31, 2016 01:27 AM2016-05-31T01:27:27+5:302016-05-31T01:28:49+5:30
इचलकरंजी --नगरपालिकां सार्वत्रिक निवडणुक
इचलकरंजी --आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘कोल्हापूर पॅटर्न’
राजाराम पाटील -- इचलकरंजी
नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची चाहूल राजकीय पक्ष व आघाड्यांना लागली असून, इचलकरंजीत शहर विकास आघाडी व भाजप असा एकत्रितपणे ‘कोल्हापूर पॅटर्न’ लढण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस फुटण्याची चिन्हे दिसत असतानाच राष्ट्रीय कॉँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पातळीवर मात्र ‘थांबा व पहा’ अशीच स्थिती आहे.
सन २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत पालिकेच्या ५७ नगरसेवकांपैकी २९ राष्ट्रीय कॉँग्रेस, ११ राष्ट्रवादी कॉँग्रेस व १७ शहर विकास आघाडी अशी स्थिती आहे. आकड्यांचा विचार करता दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेवर असली तरी अलीकडील दीड वर्षात पालिकेतील राजकारणात झालेल्या घडामोडींमुळे अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. जानेवारी २०१५ मध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन बंड केले आणि त्यांच्या या बंडाला ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. परिणामी, दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीचे बहुमत; पण कामकाजावर वर्चस्व मात्र ‘शविआ’चे अशी विचित्र स्थिती इचलकरंजी नगरपालिकेची आहे.
आगामी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे दोन लाख ९२ हजार लोकसंख्या आहे. त्याप्रमाणे ३१ प्रभागांत ६२ नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये ३१ नगरसेवक व ३१ नगरसेविका असतील. त्यापैकी मागासवर्गीयांसाठी सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेविका, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १७ नगरसेवकांपैकी नऊ नगरसेविका आणि सर्वसाधारण वर्गासाठी ३९ नगरसेवकांपैकी १९ नगरसेविका अशी आरक्षणे आहेत.
राज्यातील ‘अ’ वर्गातील सर्वांत मोठी नगरपालिका इचलकरंजी असूनही गेल्या पाच वर्षांत नवीन वाढीव हद्दीतील भुयारी गटार योजनेची सुरुवात झाली. याशिवाय एकही भरीव विकासकाम नगरपालिकेच्या माध्यमातून झालेले नाही.
बर्मन समितीप्रमाणे शहर स्वच्छता
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इचलकरंजी नगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी बर्मन समितीच्या अहवालाप्रमाणे कर्मचाऱ्यांना काम दिले. तर सर्व २५ प्रभागांत घंटागाडीचा ठेका दिला. यामुळे पूर्वी १६ प्रभागांत स्वच्छतेचा ठेका होता, तो आता फक्त नऊ प्रभागांत राबविला जात आहे. परिणामी, इचलकरंजी पालिकेची साडेचार कोटी रुपयांची बचत झाली. हा उपक्रम जिल्हास्तरावर आदर्शवत ठरला. इतकेच नव्हे तर नगरपालिका प्रशासन संचलनालयानेही याची दखल घेत प्रशंसा केली.