भाजपच्या कोपरा सभा, कॉँग्रेसच्या पदयात्रा

By admin | Published: November 18, 2016 01:05 AM2016-11-18T01:05:35+5:302016-11-18T01:01:53+5:30

इचलकरंजी नगरपालिकेसाठी धुमशान : स्पीकरवरील प्रचार गाण्यांमुळे लोकांचे मनोरंजन

BJP's Kumbra Sabha, Congress's foothills | भाजपच्या कोपरा सभा, कॉँग्रेसच्या पदयात्रा

भाजपच्या कोपरा सभा, कॉँग्रेसच्या पदयात्रा

Next

इचलकरंजी : येथील नगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध कॉँग्रेस अशी सरळ लढत असून, निवडणुकीच्या गेल्या पंधरवड्यात भाजपकडून घेण्यात आलेल्या ५० कोपरा सभा आणि कॉँग्रेसकडील घरोघरी संपर्क व पदयात्रा यामुळे शहरातील गल्लीबोळांत फटाक्यांची आतषबाजी करीत प्रचार सुरू आहे. निवडणूक प्रचार यंत्रणेत विविध उमेदवारांकडून प्रचाराच्या सुमारे दोनशे रिक्षा फिरत असून, जुन्या-नव्या चित्रपटांच्या लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर वाजणारी प्रचाराची गाणी लोकांचे मनोरंजन करीत आहेत.
नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची एक, तर नगरसेवकपदाच्या ६२ जागा असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापासून अनेक इच्छुकांनी गर्दी केली होती. निवडणुकीसाठी तब्बल ३५० उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर माघार घेण्याच्या मुदतीनंतर २३४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. इचलकरंजीत भाजपबरोबर ताराराणी आघाडी अशी, तर कॉँग्रेसबरोबर राष्ट्रवादी व शाहू आघाडी अशी युती आहे. यापैकी १५९ उमेदवार विविध राजकीय पक्ष, आघाड्या यांचे असल्यामुळे या उमेदवारांकडून व काही अपक्षांकडून दीपावली सणानंतर घरोघरी जाऊन जनसंपर्क ठेवण्यास सुरुवात केली होती. आता निवडणूक चिन्ह निश्चित झाल्यामुळे सुमारे २०० हून अधिक रिक्षांवर निवडणूक चिन्हाचे कटआउट लावलेल्या रिक्षा फिरू लावल्या. या रिक्षांवरील स्पीकरवर संबंधित उमेदवाराचे गुणगान गाणारी गाणी वाजू लागली आहेत. रिक्षा गल्ली-बोळांतून फिरताना या गाण्यांमधून लोकांचे मनोरंजन होत आहे.
भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी ६ नोव्हेंबरपासूनच प्रभागनिहाय कोपरा सभा घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्प्यात ७, नंतर ५ व आता ३ सभा त्यांच्याकडून रोज सायंकाळी घेण्यात आल्या. या सभांमधून भाजपच्या माध्यमातून झालेला विकास आणि भावी काळात होणाऱ्या विकासाबाबतचे नियोजन नागरिकांना सांगितले जात आहे. प्रत्येक मुद्द्यावर समोर बसलेल्या लोकांतून प्रतिक्रिया विचारली जात असल्यामुळे या सभांना जनसंवाद सभा असे संबोधले जात आहे. त्यांच्याबरोबर संबंधित प्रभागातील नगरसेवकपदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका स्वामी यांचाही समावेश असतो.
पुढील टप्प्यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा
पाटील यांची पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे, तर २२ नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा श्रीमंत घोरपडे चौकात रात्री घेण्याचे आयोजन
आहे.
कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन जनसंपर्क साधण्याबरोबर पदयात्रांवर अधिक भर दिला आहे. ज्या-त्या प्रभागातील उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना भेटत असून, आतापर्यंत त्यांच्या पूर्ण मतदारसंघात पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा म्हणून निवडणूक चिन्हाची आणि व्यक्तिगत जाहीरनाम्याची पत्रके वाटण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार रवी रजपुते यांनी शहरातील १५ प्रभागांमध्ये पदयात्रेद्वारे घरोघरी स्वत:ची ओळख निर्माण करणारी पत्रके वितरित केली आहेत.
त्यावेळी त्यांच्याबरोबर त्या-त्या प्रभागातील उमेदवार असतात. कॉँग्रेसकडून मोठ्या सभांचे आयोजन करण्याचे नियोजन असून, त्यासाठी खासदार अशोक चव्हाण व नारायण राणे यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या सभेची मागणी केली आहे.
शिवसेनेनेही शहरात २४ जागी आपले नगरसेवकपदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाकरिता दशरथ माने यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. शिवसेनेच्या वचननाम्याचे बुधवारी प्रकाशन झाले असून, त्यांच्याही उमेदवारांकडून घरोघरी जनसंपर्क सुरू आहे. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराकडून पदयात्रांना सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)


जाहीरनाम्यांची प्रतीक्षा
इचलकरंजीत भाजप-ताराराणी आघाडी आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शाहू आघाडी अशा दोन मातब्बर आघाड्यांमार्फत निवडणूक लढविली जात असली तरी दोघांकडूनही अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही. सभांमधूनच देण्यात येणारी आश्वासने जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट केली जातील, अशी अपेक्षा असली तरी जाहीरनाम्यांची मात्र प्रतीक्षा आहे.


प्रचार गाण्यांना चित्रपटांच्या चाली
रिक्षावरील स्पीकरवर वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांना जुन्या-नव्या चित्रपटांतील गाण्यांच्या चाली लावण्यात आल्या आहेत. अशा चालींमध्ये गुरुवारी दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यांच्या चालींची लोकप्रियता अधिक दिसून येत आहे, तर कॉँग्रेसकडून सैराट चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्याच्या चालीवर बसविलेले प्रचार गाणे लहान मुलांचे आकर्षण ठरत आहे.

Web Title: BJP's Kumbra Sabha, Congress's foothills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.