भाजपची नोट जास्त दिवस चालणार नाही

By admin | Published: January 22, 2017 12:41 AM2017-01-22T00:41:07+5:302017-01-22T00:41:07+5:30

शिवसेनेचा मेळावा : संजय मंडलिक यांची टीका; काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे जुन्या पाचशेच्या नोटा

The BJP's note will not last long | भाजपची नोट जास्त दिवस चालणार नाही

भाजपची नोट जास्त दिवस चालणार नाही

Next

कोल्हापूर : नोटाबंदीमुळे बिनकामाच्या झालेल्या ५०० व १०००च्या जुन्या नोटांसारखी स्थिती कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची झाली असून, भाजपची अवस्था ही दोन हजाराच्या नवीन नोटेसारखी आहे, ती केव्हाही बंद होऊ शकते, याउलट शिवसेना म्हणजे बंदा रुपयासह वीस, पन्नास व शंभर रुपयांची नोट आहे, जी कायमच चालणार आहे, असा टोला शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी शनिवारी येथे लगावला. मित्रपक्षाकडून लाल, हिरव्या दिव्यांची आमिषे दाखवून इतर पक्षातील लोकांची भरती सुरू असून, यामुळे त्यांचा तराफा उलटेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात शिवसेनेचा मेळावा शनिवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात झाला. यावेळी ते बोलत होते.
प्रा. संजय मंडलिक यांनी शिवसेना-भाजपची युती ही नैसर्गिक असल्याने त्याबाबत पुढे काय करायचे हे पक्षप्रमुखच ठरवतील. परंतु, अलीकडे मित्रपक्षाचे बळ वाढले असून, त्यांनी बेडकुळ्या दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना युतीसंदर्भात चर्चा करायची नसल्यास तर त्यांचे बळ त्यांना लखलाभ असो, अशा शब्दांत समाचार घेतला. कोणत्याही आमिषाविना शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी होत आहे, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत हा पक्ष एक क्रमांकावर येऊन ‘डार्क हॉर्स’ ठरून सत्ता हस्तगत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘अलीकडे जिल्हा परिषदेमध्ये एकमेकांचे हेवेदावे काढून उट्टे काढण्याचे काम सुरू आहे. भाजपकडून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध आमिषे दाखवून अनेक लोकांना पक्षात घेतले जात आहे. याउलट शिवसेनेत स्वयंस्फूर्तीने लोक येत आहेत. निवडणुकीला सामोरे जाताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रसंगी काही स्थानिक लोकांना बरोबर घेण्याची तयारीही ठेवूया.’
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनाच शिवसेनेचे आव्हान आहे. जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी निवडून येणाऱ्या उमेदवारामागे सर्वांनी एकत्र बसून ताकद लावूया व बंडखोरी टाळूया.
संजय पवार म्हणाले, सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने त्यागाची वृत्ती ठेवून पक्ष उमेदवारी देईल त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. तरीही जो गद्दारी करेल त्याच्यावर हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव पक्षप्रमुखांकडे पाठविला जाईल. यावेळी विजय देवणे, शिवाजी जाधव, संग्राम कुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, प्रभाकर खांडेकर, प्रवीण सावंत, सुषमा चव्हाण, शुभांगी पोवार, आदी प्रमुख उपस्थित होते.


भाजपचा तराफा उलटणार
भाजपच्या तराफ्यावर जनसुराज्य पक्ष, महादेवराव महाडिक चढले आहेत. त्यातच पक्षाकडून विविध आमिषे दाखवून लोकांची भर त्यात पाडली जात आहे. त्यामुळे हा तराफा उलटेल, अशी भीती कागल येथील कार्यक्रमात भाजप नेते आ. सुरेश हाळवणकर यांच्यासमोर व्यक्त केली. यावर आमचा तराफा मजबूत असल्याचे हाळवणकर म्हणाले होते, असे प्रा. मंडलिक यांनी सांगितले.
युतीसाठी आमची दारे खुली
निवडणुकीसाठी युतीकरिता आमची दारे खुली असून, आम्ही कुणालाही अडविलेले नाही, त्यामुळे मित्र पक्षाने आमच्याशी चर्चेला यावे, असे आवाहन विजय देवणे यांनी केले. परंतु, ही चर्चा शिवसेना स्वाभिमान गहाण न ठेवता करेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The BJP's note will not last long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.