भाजपचे उघड प्रयत्न सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:14+5:302021-07-09T04:16:14+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपनेही उघडपणे आपले प्रयत्न सुरू केले आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपनेही उघडपणे आपले प्रयत्न सुरू केले आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची गुरुवारी झालेली भेट याच हालचालींचा एक भाग मानला जातो.
भाजप सदस्यांची बुधवारी बैठक झाली. तेव्हा तुम्ही एकत्र रहा एवढेच सांगण्यात आले. मात्र, तरीही प्रयत्न केले नाहीत असे व्हायला नको म्हणून भाजपने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करताना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे काही सदस्य अनुपस्थित ठेवण्याची खेळी खेळली गेली होती. जी यशस्वी झाली. त्याचीच पुनरावृत्ती केली जाऊ शकते. परंतु गोळाबेरीज किती होते यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. एकही पद न घेता पुढाकार घेणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. जनसुराज्यलाही असाच प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु याबाबत उघडपणे कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्या काय निर्णय होतो यावरच भाजपच्या पुढच्या हालचाली अवलंबून राहणार आहेत.
चौकट
भाजपचे गणित अवघडच
मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी आतापर्यंतची कोणतीच निवडणूक हलक्यात घेतलेली नाही. शौमिका महाडिक अध्यक्ष झाल्या, त्यावेळी भाजप शिवसेना सत्तेत होते. तरीही शिवसेना एकत्रितपणे भाजपसोबत राहिली नाही. आता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कितीही नाराजी असली तरी शिवसेना पदाधिकाऱ्यांना राजीनामे द्यावे लागले. परिणामी ३३ चा जादुई आकडा गाठणे भाजप आणि मित्रपक्षांना अजिबात सोपे नाही. जिल्हा परिषदेची निवडणूक सहा महिन्यांवर आली असताना अगदीच पाच, सहा जणांनी आपली कारकीर्दच पणाला लावली तरच असे होऊ शकते, अन्यथा नाही.
चौकट
राहुल पाटील यांचे नाव आल्यास भाजप शांत
जर अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव पुढे आले तर मात्र भाजप फारशी खळखळ करणार नाही, असे दिसते. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्यातील संबंधांचा हा परिणाम असेल असे मानले जाते.