महाडिकांना भाजपची ताकद

By admin | Published: December 13, 2015 01:27 AM2015-12-13T01:27:02+5:302015-12-13T01:27:02+5:30

सुरेश हाळवणकर : १०० मते मिळवून देणार, पाठिंबा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा

BJP's power in Maharashtra | महाडिकांना भाजपची ताकद

महाडिकांना भाजपची ताकद

Next

 कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांना मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतला आहे. त्यामुळे महाडिक यांच्या पारड्यात भाजपची जिल्ह्यातील १०० मते टाकली जातील, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार महादेवराव महाडिक यांना भाजपने दिलेला पाठिंबा हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल, असा दावा आमदार हाळवणकर यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, लोकशाहीत निवडणूक लढविणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क असतो. यामुळे आम्ही भाजपतर्फे नगरसेवक विजयराव सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज भरला होता; परंतु विजयापर्यंतचा टप्पा गाठण्याएवढी मते आमच्या पक्षाकडे नाहीत. त्यामुळे निवडणूक लढविण्यापेक्षा आपल्या विचारांच्या उमेदवारास पाठिंबा द्यावा, असा विचार पुढे आला. त्यानुसार शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मी स्वत: नागपूर येथे एकत्र बैठक घेऊन आमदार महाडिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
आमदार महाडिक यांची उमेदवारी ही सर्वपक्षीय आहे. त्यांच्याशी असलेले आमचे राजकीय संबंध, त्यांचे पुत्र अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचे दुसरे पुत्र स्वरूप महाडिक यांच्या ताराराणी आघाडीसोबत भाजपची महापालिकेत आघाडी आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही महाडिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाडिक यांनी आमच्याकडे येऊन पाठिंबा द्या, अशी मागणीही केली नव्हती. हा आमचा निर्णय आहे, असे हाळवणकर यांनी सांगितले.
भाजपची मते साधारण ६५ ते ७० आहेत. त्याचबरोबर आमच्या शब्दावर काही मते मिळणार आहेत. साधारण १०० मते आम्ही महाडिक यांना मिळवून देऊ. कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या भूमिका प्रत्येक निवडणुकीवेळी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत अद्दल घडविणार असल्याचे हाळवणकर म्हणाले. यावेळी महानगरचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई, मनपा गटनेते संभाजी जाधव, नगरसेवक विजयराव सूर्यवंशी, अजित ठाणेकर, आशिष ढवळे, राहुल चिकोडे, अ‍ॅड. संपतराव पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's power in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.