‘भाजप’ची सत्तेची वाट बिकटच संभाव्य महापालिका पोटनिवडणुका : १९ पैकी १५ जागा जिंकाव्या लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:46 AM2018-08-25T00:46:34+5:302018-08-25T00:48:12+5:30
जातवैधता प्रमाणपत्रे निर्धारित वेळेत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर न केल्यामुळे महानगरपालिकेच्या १९ नगरसेवकांना घरी जावे लागणार, हे आता स्पष्ट झाल्यामुळे कोल्हापूर शहरात १९ प्रभागांत फेरनिवडणुकीचे वातावरण घोंगावू लागले आहे.
जातवैधता प्रमाणपत्रे निर्धारित वेळेत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर न केल्यामुळे महानगरपालिकेच्या १९ नगरसेवकांना घरी जावे लागणार, हे आता स्पष्ट झाल्यामुळे कोल्हापूर शहरात १९ प्रभागांत फेरनिवडणुकीचे वातावरण घोंगावू लागले आहे. मागच्या निवडणुकीत थोडक्यात संधी गमावलेल्या कार्यकर्त्यांनी फेरनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक कोणालाच परवडणारी नाही तरीही निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रसंग आलाच तर ‘भाजप’ला सत्तेपर्यंत पोहोचण्याची वाट अतिशय बिकट आहे, कारण त्यांना १९ पैकी किमान १५ जागा जिंकण्याचे आव्हानात्मक दिव्य पार पाडावे लागणार आहे आणि हे आव्हान आजच्या घडीला कठीण आहे.
भारत चव्हाण ।
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निकालामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत एक अभूतपूर्व प्रसंग उद्भवला आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवकपदे रद्द झाली नव्हती. यावेळी जातीची वैधता प्रमाणपत्रे वेळेत सादर न केल्यामुळे १९ जणांना नगरसेवक पदास मुकावे लागत आहे; जवळपास एकतृतीयांश शहरात प्रत्यक्ष निवडणूक होऊ घातल्याने आणि सर्वच राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांचा त्यात सहभाग राहणार असल्याने शहरातील वातावरण ढवळून जाण्याची शक्यता आहे. एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली असताना अचानक महानगरपालिकेच्या १९ प्रभागांत निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पुढे काय काय होणार याबाबत सर्वत्र उत्सुकता लागून राहिली आहे.
महानगरपालिकेच्या १ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादीने निर्विवादपणे ४४ जागा जिंकून काठावरचे का असेना बहुमत मिळविले होते. याउलट भाजप - ताराराणी आघाडीने प्रयत्नांची बाजी करूनसुद्धा अवघ्या काही जागा कमी पडल्याने सत्तेने हुलकावणी दिली. ही निवडणूक झाल्यानंतर, तसेच संख्याबळ स्पष्ट झाल्यानंतरही पुढे काही महिने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ‘चमत्काराची भाषा’ बोलू लागले होते; पण त्यांना भाजपचा महापौर करता आला नाही. गेल्या तीन वर्षांपासूनचे हे शल्य त्यांना बोचत होते. ते कमी करण्याकरिता राष्ट्रवादीतील बंडखोरांना प्रोत्साहन देऊन त्यांनी स्थायी समितीचे सभापतिपद भाजपकडे खेचून घेतले. त्यावेळी घोडेबाजाराचाही आरोप झाला तरीही मुख्य सत्तेपासून त्यांना कोसो दूर राहावे लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका जसा कॉँग्रेस- राष्टÑवादी आघाडीला बसला, तसाच तो भाजप-ताराराणी आघाडीलाही बसला आहे. कॉँग्रेस-राष्टÑवादीचे ११ नगरसेवक घरी जाणार आहेत, तर भाजप-ताराराणीच्या ७ नगरसेवकांवर तशी वेळ आली आहे; त्यामुळे सत्तारुढ आणि विरोधी आघाड्यांचे संख्याबळ घटले असून ते अनुक्रमे ३३ आणि २६ पर्यंत खाली आले आहे. उद्या फेरनिवडणूक झालीच, तर भाजप-ताराराणी आघाडीला कमीत कमी १५ जागा जिंकाव्या लागतील. तेव्हा कुठे त्यांचे संख्याबळ ४१ पर्यंत जाऊ शकते; मात्र वरवर पाहता हे काम अतिशय कठीण आहे.
भाजप - ताराराणी आघाडीला आपल्या ७ नगरसेवकांना पुन्हा निवडून आणण्याबरोबरच कॉँग्रेस- राष्टÑवादीच्या गोटातील आठ जागा हिसकावून घ्याव्या लागतील. हे आव्हानात्मक काम पेलायचे झाल्यास तेथे ताकदीचे उमेदवार देण्यापासून आवश्यक ती सर्व रसद पुरवावी लागणार आहे. एकवेळ रसद पुरविली जाईल; मात्र सक्षम उमेदवार कसे मिळणार हा एक मोठा प्रश्न त्यांना भेडसावणार आहे.
याउलट कॉँग्रेस-राष्टÑवादीची उमेदवारी विद्यमान नगरसेवकांनाच दिली जाईल. एखाद्या-दुसऱ्या जागेचा निकाल उलटा जाईल. बाकीचे उमेदवार निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत. त्यांच्या ११ नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने संख्याबळ ३३ वर आले आहे; त्यामुळे सत्तेपर्यंत जाण्यास त्यांना किमान ८ जागा जिंकाव्या लागणार आहेत. भाजपच्या तुलनेत हे काम थोडे सोपे आहे. कारण कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडे स्वाती यवलुजे, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, दीपा मगदूम, अश्विनी रामाणे, वृषाली कदम, हसिना फरास, सचिन पाटील, अफजल पिरजादे यांच्यासारखे पुन्हा निवडून येणारे सक्षम उमेदवार आहेत. उलट भाजप -ताराराणीच्या ७ प्रभागांतील दोन-तीन जागाही जिंकण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे म्हणूनच जर फेरनिवडणूक लागली, तर सत्तेपर्यंत जाण्याचा भाजप-ताराराणी आघाडीचा मार्ग खडतर राहील.
कोट्यवधींचा चुराडा होणार
जर महानगरपालिकेच्या १९ प्रभागांत निवडणूक लागलीच तर त्यामध्ये कोट्यवधीचा चुराडा होणार आहे. राज्यात तसेच देशात सत्तेत असलेल्या भाजपची परिस्थिती तशी सक्षम झाली आहे; त्यामुळे कॉँग्रेस - राष्टÑवादीशी लढत देताना भाजपकडून हात सैल सोडले जाण्याची शक्यता आहे. परिणाम जिंकण्यासाठी कॉँग्रेस - राष्टÑवादीलाही मोठी किंमत मोजावी लागणार आहे. राजकीय पक्षांचा पैसा तर खर्च होणारच आहे, शिवाय महापालिका निवडणूक यंत्रणेलाही मोठा आर्थिक भार सोसावा लागणार आहे.
भाजपला सत्तेचे डोहाळे
२०१५ मधील महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आणि बहुमताचे आकडे स्पष्ट झाल्यानंतरदेखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चमत्काराची भाषा केल्याने, तसेच सहा महिन्यांपूर्वी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण करून आशिष ढवळे यांना सभापती करण्याची किमया साधल्याने भाजपला महापालिकेतील सत्तेचे डोहाळे लागल्याचे स्पष्ट होत आहे. पाटील यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न किमान फेरनिवडणुकीत तरी साध्य होते का बघूया भूमिकेतून भाजप या निवडणुकीकडे पाहण्याची शक्यता आहे.
सांगली-जळगावमुळे आत्मविश्वास वाढला
देशभरात भाजपविरोधी वातावरणाची हवा असताना, जळगाव व सांगली महानगरपालिकेची निवडणूक भाजपने निर्विवाद जिंकून ही हवा काढून टाकली. स्वाभाविकच या दोन विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याच्या जोरावरच कोल्हापूर महानगरपालिकेतसुद्धा आपण सत्तेत येऊ, अशी आशा भाजपला आहे. राज्यातील सत्ता, साधने सगळी हातात असल्याने आपण या परीक्षेतही पास होऊ, अशी भाजपची अपेक्षा असू शकते.