इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 'स्वबळ' नाही तर 'मैत्रीपूर्ण बळ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 02:28 PM2021-12-10T14:28:51+5:302021-12-10T14:29:23+5:30
इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले संकेत.
इचलकरंजी : येथील नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी सुरू असली तरी आमदार प्रकाश आवाडे यांच्याबरोबर चर्चा करून एकत्रित निवडणुकीला सामोरे जावू. तसे न जुळल्यास गरज असेल, अशा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. याबाबत शहरातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांची त्यांनी भेट घेऊन मते आजमावली.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी गुरूवारी नगराध्यक्षा अलका स्वामी व अशोक स्वामी यांच्या निवासस्थानी खासगी स्वरूपाची भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शहरातील एकूण राजकीय परिस्थिती, विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घडामोडी, त्याचे आगामी नगरपालिका निवडणुकीवर होणारे परिणाम याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी शहरातील काही प्रमुखांच्या भेटी घेतल्या. निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्वबळासंदर्भात सध्या फक्त चाचपणी सुरू आहे. परंतु आवाडेंसोबत याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
एकत्रित चांगली ताकद लागत असल्यास त्यादृष्टीनेही पाऊले उचलली जातील, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. त्यावर आवाडे स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावरही त्यांनी ते त्यांचे यापूर्वीचे मत होते. आता आमच्याकडून तसेच त्यांच्याकडून जनतेचा कौल घेण्याचे काम सुरू आहे. त्यातून जनता व स्थानिक नेते यांच्यातील सूर बघुन पुढे निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
किमान चहा तरी पिऊ
पत्रकारांनी निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी आवाडेंसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे उत्तर देत असताना शहरातील भाजपच्या एका प्रमुख पदाधिकाºयाने त्यांना स्वबळावर लढणार, असे स्पष्ट सांगा म्हणून कानात सांगितले. तरीही पाटील यांनी किमान त्यांच्याशी चर्चा करत चहा तरी पिऊ असे खोचक उत्तर दिले.