नाराजी टाळण्यासाठी भाजपची नरमाई

By admin | Published: December 27, 2015 11:56 PM2015-12-27T23:56:59+5:302015-12-28T00:29:35+5:30

तासगाव नगरपालिका उपनगराध्यक्ष बदल : राजीनाम्याबाबत आज नगरसेवकांची बैठक

BJP's slackness to avoid resentment | नाराजी टाळण्यासाठी भाजपची नरमाई

नाराजी टाळण्यासाठी भाजपची नरमाई

Next

तासगाव : आबा गटाचे उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांच्या राजीनाम्याबाबत नगरसेवकांचा दबाव आहे. मात्र तरीदेखील भाजपला पाठिंबा दिलेल्या आबा गटातील नगरसेवकांची नाराजी पत्करावी लागू नये, यासाठी भाजपने राजीनाम्याबाबत नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत सोमवारी सत्ताधारी गटाची बैठक होणार आहे.
पालिकेत सद्यस्थितीत भाजप आणि आबा गटांतर्गत असणारा एक गट, अशीच सत्ता आहे. आबा गटातील काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपकडे एकहाती सत्ता आहे. तरीदेखील भाजपने आबा गटाकडे उपनगराध्यक्ष पद कायम ठेवून सत्तेत सोबत घेतले आहे. मात्र भाजपकडून दोन महिन्यात नगराध्यक्ष बदलल्यानंतर भाजप-राष्ट्रवादीच्या सत्तेतील घरोब्याबाबत चर्चा होऊ लागली. त्यातच उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांकडून उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढू लागला. त्यामुळे सुरेश थोरात यांना राजीनामा देण्याच्या सूचना पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी केल्या. आठ दिवसांचा कालावधी झाल्यानंतरही थोरात यांनी राजीनामा दिला नाही. याउलट नगरसेवक अजय पाटील यांच्याशी चर्चेनंतरच राजीनाम्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
पालिकेत वर्चस्व नसतानादेखील भाजपच्या नगरसेवकांनी तत्कालीन नगराध्यक्ष अजय पवार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती.
त्याच घडामोडीत एकहाती वर्चस्व निर्माण करुन पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यातदेखील यश मिळविले होते. मात्र उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत भाजपने नरमाईची भूमिका घेतली आहे. या भूमिकेची सध्या राजकीय वर्तुळातही उलट-सुलट चर्चा होत आहे. उपनगराध्यक्षांसोबत केवळ दोन नगरसेवक असतानादेखील त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरदेखील राजीनामा दिला नाही.
तसेच भाजपच्या नगरसेवकांतून दबाव असतानादेखील भाजपने वेट अ‍ॅण्ड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे भाजपची नरमाईची भूमिका कशासाठी? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी राजीनाम्यासंदर्भात सत्ताधारी गटातील नगरसेवकांची बैठक होत आहे. या बैठकीत तरी निर्णय होणार का? याची उत्सुकता आहे.
उपनगराध्यक्ष सुरेश थोरात आबा गटाचे असले तरी, नगरपालिकेत ते भाजपसोबत सत्तेत आहेत. पालिकेत आबा गट आणि काका गटात सोयरिक आहे. मात्र उपनगराध्यक्ष थोरात यांनी सत्तेत सोबत राहूनदेखील भाजपविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने आंदोलन केले होते, तर नुकतेच अवैध धंद्यांविरोधात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या दोन्ही आंदोलनात थोरात सक्रिय होते. त्यांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागून राहिले आहे.


पालिकेत भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. भाजपला पाठिंबा दिलेल्या आबा गटातील नगरसेवकांमुळे सद्य स्थितीत दोन नगरसेवकांचा अपवाद सोडल्यास अन्य सर्व नगरसेवक सत्ताधारी गटात आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष आणि सभापती निवडीत सत्ताधारी गटातीलच काही नगरसेवक नाराज झाले आहेत. तर उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्यावरून भाजपला पाठिंबा दिलेला आबा गट नाराज झाल्यास, विरोधकांच्या संख्येत भर पडणार आहे. त्याचा परिणाम विकासकामांबाबतचे निर्णय घेताना होणार आहे. त्यामुळेच ही नाराजी टाळण्यासाठी भाजपकडून उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

तीन महिन्यांपूर्वी आबा गटातील काही नगरसेवकांना नगराध्यक्षपदाची आॅफर देऊन भाजपमध्ये प्रवेश करून घेतला होता. उपनगराध्यक्ष सुरेश थोरात आबा गटाशी एकनिष्ठ आहेत. त्यांनाही भाजपमध्ये घेऊन राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी भाजपकडून हालचाली झाल्या आहेत. थोरातांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर उपनगराध्यक्षपद कायम ठेवण्याची आॅफर भाजपकडून दिली असल्याची चर्चा आहे.

Web Title: BJP's slackness to avoid resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.