सेनेच्या विरोधात भाजपची रणनीती
By admin | Published: October 24, 2015 01:04 AM2015-10-24T01:04:50+5:302015-10-24T01:09:31+5:30
प्रतिष्ठा पणाला : चंद्रकांतदादा शहरात तळ ठोकणार
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत कमळ फुलविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात तळ ठोकण्याचे नियोजन केले आहे. सत्ता तर काबीज करायचीच; परंतु शिवसेनेपेक्षा किमान एक तरी जागा जास्त मिळाली पाहिजे, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्याच्याशी या पक्षाची प्रतिष्ठा जोडली गेली आहे.
‘विधानसभेला स्वबळावर लढलो म्हणूनच खरी ताकद कळाली,’ असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातच भाजपच्या राज्य अधिवेशनात केले होते. त्यावरून बराच गदारोळ उठला होता. दोन पक्षांतील राजकीय संबंधही ताणले होते. भाजपच्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग त्याचदिवशी फुंकले. त्यानंतर भाजपने पद्धतशीरपणे शिवसेनेला बाजूला करून आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी संगत केली. महाडिक यांची संघटनात्मक व आर्थिक ताकद आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा लाभ उठवून महापालिकेत सत्तेवर येण्याचे हे गणित आहे.
मावळत्या सभागृहात शिवसेनेचे चार, तर भाजपचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेनेला ३९ हजार २४, तर भाजपला १३ हजार १०५ मते मिळाली होती. एकूण मतांमध्ये शिवसेना चौथ्या स्थानावर तर तब्बल भाजप सहाव्या स्थानावर राहिली; परंतु वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मतांचा सगळा बॅकलॉग भरून काढून जोरदार मुसंडी मारली. त्या पक्षाचा ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये आमदार असून ‘कोल्हापूर उत्तर’मध्येही महेश जाधव यांना ४० हजार मते मिळाली आहेत. त्यावेळी देशात आणि राज्यातही नरेंद्र मोदी यांचे वारे होते. आता ते वारे थोडे विसावले आहे. त्यामुळे भाजपचीच या निवडणुकीत खरी कसोटी आहे. दोन्ही काँग्रेसची देशातील व राज्यातीलही सत्ता गेल्यामुळे या निवडणुकीत त्यांना काही मिळवायचे नाही. भाजपला सत्तेपासून रोखणे हेच त्यांचे मुख्य टार्गेट आहे. शिवसेनेपासून बाजूला होऊन राज्यात ‘एक नंबर’चा पक्ष बनू शकलो. त्याच धर्तीवर कोल्हापुरातही शिवसेनेला मागे टाकून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. कोणत्याही स्थितीत शिवसेनेपेक्षा एकतरी जागा जास्त जिंकून दाखवाच, असे आदेश पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले आहेत. शिवसेनेला हिणविण्यासाठी भाजपला ते करून दाखवायचे
आहे.
भाजपचे महापालिकेतील यश हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मंत्री पाटील हे बुधवारपासून मतदान होईपर्यंत कोल्हापुरात तळ ठोकणार आहेत. मंत्रिमंडळाची बैठक संपवून ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यानंतर निकाल झाल्यावरच ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला जातील. जाताना ते महापालिकेतील सत्तेचा गुलाल अंगावर घेऊन जातात की नाही हीच लोकांच्यात उत्सुकता आहे.