भाजपचे अस्तित्व पणाला

By admin | Published: June 27, 2016 12:19 AM2016-06-27T00:19:46+5:302016-06-27T00:37:12+5:30

जयसिंगपूर बाजार समिती निवडणूक : भाजप विरुद्ध सर्व पक्ष-गट एकत्र

BJP's survival | भाजपचे अस्तित्व पणाला

भाजपचे अस्तित्व पणाला

Next

गणपती कोळी -- कुरुंदवाड जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला जोर चढला आहे़ भाजप विरुद्ध सर्व पक्ष-गट अशी लढत लागली आहे़ भाजप आघाडीचे नेतृत्व मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ़ संजय पाटील हे करीत असून, या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना राजकीय पुनरागमनाची सिद्धता सिद्ध करण्याचे, तर भाजपला निवडणुकीतील वजाबाकीचा हिशेब चुकता करण्याचे आव्हान आहे़ यामध्ये दोघेही कितपत यशस्वी होतात़, यावरच त्यांचे तालुक्यातील राजकीय अस्तित्व सिद्ध होणार आहे़ लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर तब्बल एक तपाहून अधिक काळ राजकीय वनवासानंतर डॉ़ संजय पाटील यांनी हातामध्ये कमळ घेऊन पुन्हा राजकीय श्रीगणेशाला सुरुवात केली आहे़ डॉ़ पाटील यांचा सहकार व सहकार्याच्या माध्यमातून तालुक्यात चांगलाच गट होता़ मात्र, १२ वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही काळ राजकीय संन्यास घेतल्याने व सहकाराच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने कार्यकर्त्यांचा संपर्क तुटला़ त्यामुळे त्यांचे बरेच कार्यकर्ते इतर गटांत विखुरले गेले़ गत विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत डॉ़ पाटील यांनी हातात कमळ घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला़ राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्याने डॉ़ पाटील यांचा आत्मविश्वास वाढला असून, तालुक्याच्या राजकारणात ते पुन्हा सक्रिय झाले आहेत़ अवघ्या सहा महिन्यांत कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक होणार असून, त्याची चाचपणीही त्यांनी चालू केली आहे़ त्यातच जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध निवडीत भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली होती़ मात्र, केवळ भाजपला वगळून यड्रावकर, सा़ रे़ पाटील गट, स्वाभिमानी संघटना, शिवसेना एकत्र आल्याने व भाजपचा इगो दुखावल्याने निवडणूक लागली आहे़ भाजप : आर-पारची लढाई होणार भाजप आघाडीचे नेतृत्व डॉ़ पाटील करीत असून, निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणातील त्यांच्या पुनरागमनातील ताकद सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे़ शिवाय केंद्रात, राज्यात भाजप शासन असताना बिनविरोध प्रस्तावात भाजपला प्रस्तापितांनी शिवूनही न घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांचाही इगो दुखावला आहे़ या अपमानाचा वचपा काढून हिशेब चुकता करण्यासाठी भाजपला आर-पारची लढाई लढावी लागणार आहे़ यामध्ये मतदारांचे मतपरिवर्तन करण्यात कितपत यशस्वी होतात, यावरच डॉ़ पाटील व भाजपचे तालुक्यातील राजकीय वर्चस्व स्पष्ट होणार आहे़

Web Title: BJP's survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.