कोल्हापूर महापौरपदाबाबत भाजपची तलवार म्यान

By admin | Published: November 13, 2015 11:20 PM2015-11-13T23:20:30+5:302015-11-14T00:31:01+5:30

चंद्रकांतदादाचा ‘यू टर्न’ : विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणार

BJP's Sword Sheath About Kolhapur Mayor | कोल्हापूर महापौरपदाबाबत भाजपची तलवार म्यान

कोल्हापूर महापौरपदाबाबत भाजपची तलवार म्यान

Next

कोल्हापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भरवशावर अवलंबून राहिलेल्या कोहापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी अचानक ‘यू टर्न’ घेत महापौरपदाच्या निवडणुकीत आपली ‘तलवार म्यान’ केली. गेले काही दिवस महापौर-उपमहापौर निवडणुकीत चमत्कार घडविण्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी आता महापालिका सभागृहात भाजप-ताराराणी आघाडीने एक प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे आता काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचे उपमहापौर होण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला भाजप किंवा ताराराणी आघाडीचा महापौर करण्यासाठी मदत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या जोरावर आम्ही ‘चमत्काराची भाषा’ केली होती परंतु गुरुवारी त्यांनीच आता हे अशक्य असल्याचा निरोप पाठविला. त्यामुळे भाजप व ताराराणी आघाडीने महानगरपालिका सभागृहात ‘विरोधी पक्ष’ म्हणून भूमिका बजावण्याचे ठरविले आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे ४४ इतके संख्याबळ आहे, तर शिवसेनेचे चार नगरसेवक धरून भाजप-ताराराणी आघाडीकडे ३७ नगरसेवक आहेत. संख्याबळाचा विचार करता काँग्रेस व राष्ट्रवादीचे महापौर-उपमहापौर होणार हे स्पष्ट असतानाही आठ दहा दिवसांपासून पालकमंत्री ‘भाजपचाच महापौर होईल’, असे ठामपणे सांगत होते; परंतु शुक्रवारी अचानक त्यांनी महापालिका सभागृहात भाजप-ताराराणीचे नगरसेवक एक प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून आपली भूमिका बजावतील, असे सांगून टाकले.
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतही सत्तेपर्यंत पोहोचण्यात अगदी काही जागा कमी पडल्या म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे सहकार्य मागितले होते. महानगरपालिकेत आम्ही सत्तेवर आलो तर शहराच्या विकासात अधिक सुसूत्रता आणि सोपेपणा येईल, असे चंद्रकांतदादा म्हणाले.


घोडेबाजार ही आमची संस्कृती नव्हे
महापालिकेत नगरसेवकांना फोडून घोडेबाजार करणे ही आमची संस्कृती नाही. आम्हाला तसे करायचेही नाही. आमच्या चमत्कारात घोडेबाजार बसत नाही. ‘ताराराणी’चा महापौर करावा, आम्ही बाहेर थांबतो असा शेवटचा प्रस्ताव आम्ही राष्ट्रवादीकडे दिला होता. भाजप बाहेर थांबल्यास ते मदत करतील, अशी अपेक्षा होती; परंतु त्यासही नकार दिला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीचे एकत्रित १५ नगरसेवक येणार नसतील तर आपण विरोधी पक्षात बसावे, अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो. कोणावर दबाव टाकण्याचा व धमकावण्याचा प्रयत्न आमच्याकडून होणार नाही, असे पाटील म्हणाले.

Web Title: BJP's Sword Sheath About Kolhapur Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.