कोल्हापूर उत्तरमधील भाजपचा विजय सोपा, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 01:27 PM2022-04-11T13:27:28+5:302022-04-11T13:27:56+5:30
कोल्हापूर : काँग्रेस सरकारच्या काळात जैन, साधू आणि मुनींवर हल्ले झाले आहेत. जातीपातीत आणि समाजात संघर्ष निर्माण करायचा आणि ...
कोल्हापूर : काँग्रेस सरकारच्या काळात जैन, साधू आणि मुनींवर हल्ले झाले आहेत. जातीपातीत आणि समाजात संघर्ष निर्माण करायचा आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची, ही काँग्रेसची आजवरची नीती आहे. सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत, विरोधकांनी दहशत आणि दबावाचे राजकारण सुरू केले आहे. यामुळे उत्तरमधील भाजपचा विजय सोपा झाला आहे, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
शुभंकरोती हॉलमध्ये रविवारी चाय पे चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी थेट मंगळवार पेठ, बेलबाग परिसरातील जैन बांधवांशी संवाद साधला. सत्यजित कदम यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विरोधकांकडून सत्तेचा आणि पदाचा कितीही गैरवापर केला, तरी कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीरनगरीची कुस्तीपंढरी म्हणून ओळख आहे. येथे तालमी चालतील, पण दहशत चालणार नाही. कोल्हापूरची जनता दहशत झुगारून देत, सत्यजित कदम यांनाच विजयी करतील.
ललित गांधी म्हणाले, समाजाच्या जडणघडणीत जैन समाजाचा मोठा वाटा आहे. जैन समाजाने स्वतःच्या हिमतीवर एकी आणि प्रगती साधली आहे. त्यामुळे भाजपच्या विकासाची ध्येयधोरणे या समाजाला पटली आहेत. त्यामुळे भाजपच्या पाठीशी जैन समाजाचे पाठबळ आहे.
या वेळी माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, उमेदवार सत्यजित कदम, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांचीही भाषणे झाली. कदम यांच्या प्रचारासाठी पुण्याहून भाजप जैन समाज प्रतिष्ठानच्या महिला सदस्या कोल्हापुरात आल्या आहेत. या प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री मोदी, तृप्ती चोभारकर यांनी नियोजन केले. कार्यक्रमाला भरत गांधी, हितेश ओसवाल, किरण नकाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.