भाजपचा शिवाजी चौकात विजयोत्सव
By admin | Published: February 24, 2017 12:12 AM2017-02-24T00:12:17+5:302017-02-24T00:12:17+5:30
साखर वाटून आनंद : गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर अपेक्षित यश मिळाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्यावतीने गुरुवारी कोल्हापुरात शिवाजी चौकात विजयी जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण आणि विजयाच्या घोषणा देत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी या जल्लोषात सहभागी झाले. त्यांनी विजयोत्सवाबद्दल साखर वाटून आनंद साजरा केला.
भाजप आघाडीला जिल्हा परिषदेमध्ये अपेक्षित यश मिळाल्याने गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात शिवाजी चौकात पक्षाच्यावतीने साखर वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. दुपारनंतर भाजप ‘जादुई आकडा’नजीक पोहोचल्याने भाजपचे सर्व कार्यकर्ते शिवाजी चौकात एकत्र आले. त्यांनी गुलालाची उधळण करत भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या. फटाक्यांची आतषबाजी करत साखर वाटून जल्लोष केला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी समर्थकांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयाची खूण केल्यानंतर समर्थकांनी पुन्हा गुलालाची उधळण करत घोषणांनी परिसर दुमदुमला.
यावेळी जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नगरसेवक विजय सूर्यवंशी, शेखर जाधव, विजय खाडे, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, अॅड. संपतराव पवार, महेश जाधव, विनय जाधव, सुरेश जरग, सर्जेराव जरग, राजू मोरे, महेश मोरे, रतन बाणदार, हेमंत आराध्ये, नचिकेत भुर्के, संतोष भिवटे, गणेश देसाई, अभिजित कालेकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
...अन् दादाही नाचले
कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता स्थापण्याचे स्वप्न भंगल्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये भाजप मित्रपक्षांची सत्ता स्थापन होण्याची खात्री निर्माण झाल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा गुरुवारी निकालानंतर चांगलेच आनंदी होते. शिवाजी चौकात विजयोत्सवात ढोल-ताशाच्या तालावर भाजपचे कार्यकर्ते नाचत होते. मंत्री चंद्रकांतदादा चौकात पोहोचल्यावर त्यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. तेही ढोल-ताशाच्या ठेक्यावर संघटनमंत्री बाबा देसाई यांच्यासह हात उंचावून काही वेळ नाचले.
कार्यालयात उत्साह
कोल्हापूर : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चांगल्या यशाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजप कार्यालयात उत्साह दिसून आला. या ठिकाणी निकालाची माहिती घेऊन आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांची दिवसभर गर्दी झाली होती. सकाळी नऊ वाजल्यापासून भाजपच्या बिंदू चौक येथील कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये, नगरसेवक विजय सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्यासह राज्यभरातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांची माहिती घेत होते.