भाजपचे विजय भोजे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:27 AM2021-02-09T04:27:51+5:302021-02-09T04:27:51+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपचे सदस्य व विरोधी पक्षनेते विजय जयसिंग भोजे (वय ४५, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपचे सदस्य व विरोधी पक्षनेते विजय जयसिंग भोजे (वय ४५, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) यांच्याविरोधात शनिवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा परिषदेतील एका महिला अधिकाऱ्यांनीच त्यांच्याविरोधात तक्रार दिल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. त्यांनी शनिवारी संध्याकाळी ५ ते ११ या वेळेत शाहूपुरी पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २४ ऑक्टोबर २०१९ ते आजपर्यंत फोनच्या माध्यमातून, तसेच भोजे यांच्या घरी आणि जिल्हा परिषदेत वारंवार हा प्रकार झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
ही तक्रार मॅट घोटाळा बाहेर काढल्यामुळे झाली असल्याचा दावा भोजे यांनी केला असून, जिल्हा परिषद सदस्य त्यामुळे संतापले असून, याचे पडसाद मंगळवारी उमटण्याची शक्यता आहे. भाजपचे तत्कालीन पक्षप्रतोद असलेले भोजे यांनी आपल्याकडे दिवाळीची मागणी केली. कुठे आणून देऊ, अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी २४ ऑक्टोबर २०१९ ला फोन करून घरी बोलावून घेतले. यावेळी मला पैसे नको होते, असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्याच रात्री फोन करून तुम्हाला एकटीला येण्यास सांगितले असता, मुलीला बरोबर घेऊन का आला, तुम्हाला कळत नाही का, अशी विचारणा केली. आय लाईक यू असे बोलून यानंतरही त्यांनी एका प्रकरणामध्ये मला जाणीवपूर्वक त्रास सुरू केला आहे. वारंवार अश्लील हेतूने बघून मला मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मी ऑफिसमध्ये वारंवार तुमच्याकडे येतो, कशासाठी येतो, हे तुम्हाला समजत नाही का, असेही त्यांनी म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे भोजे यांच्याविरोधात विनयभंग करणे आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे असे भादंवि कलम ३५४ आणि ५०९ या कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. सकाळपासूनच अधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात या तक्रारीची चर्चा सुरू होती. मात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर ही माहिती पडताच त्याची प्रतिक्रिया उमटली.
कोट
आज उमटणार पडसाद
हा प्रकार समजल्यानंतर जिल्हा परिषदेचे सर्वपक्षीय सदस्य संतप्त झाले आहेत. एकीकडे घोटाळा उघडकीस आला असताना महिला अधिकाऱ्याने जिल्हा परिषदेच्या जबाबदार पदाधिकाऱ्याविरोधात तक्रार दिल्यामुळे सदस्यांनी भोजे यांना पाठिंबा दिला असून, जिल्हा परिषदेत सर्वजण मंगळवारी एकत्र येणार आहेत.
लढाई थांबणार नाही
जिल्हा परिषदेतील मॅट खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याविरोधात मी सातत्याने सभागृहामध्ये आवाज उठवत असल्यामुळे ही खोटी तक्रार करण्यात आली आहे. न्यायालयावर माझा विश्वास आहे. जिल्हा परिषदेतील या भ्रष्टाचाराविरोधात लढाई थांबणार नाही असे भोजे यांनी म्हटले आहे.
०८०२२०२१ कोल विजय भोजे