‘भाजप’च्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीवर तोंडसुख
By admin | Published: June 7, 2015 01:27 AM2015-06-07T01:27:58+5:302015-06-07T01:27:58+5:30
प्रतिमोर्चा : कार्यकर्ते दादांच्या दारात; कार्यकर्त्यांची नाळ घट्ट झाल्याचा चंद्रकांतदादा पाटील यांचा विश्वास
कोल्हापूर : जिल्हा बॅँकेत १४२ कोटी रुपयांचा घोटाळा केलात, यानंतर सत्तेवरून पायउतार होताच गेल्या सहा महिन्यांत चंद्रकांतदादांकडून मागील दाराने कामे करून घेतली. स्वत:च्या चैनीसाठी सहकारात स्वाहाकार माजविणाऱ्यांना आमचे मानबिंदू असलेल्या मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. मोर्चा, आंदोलने करून निवेदने देण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र, त्यासाठी घर हे ठिकाण नव्हे. आता केली एवढी चूकबस्स झाली, पुन्हा अशी चूक कराल, तर याद राखा, अशा शब्दांत ‘भाजप’च्या कार्यकर्त्यांनी आमदार हसन मुश्रीफ व राष्ट्रवादीवर शनिवारी प्रतिमोर्चानिमित्त तोंडसूख घेतले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसने मंत्री पाटील यांच्या संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनी येथील निवासस्थानी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादीच्या या मोर्चास शह देण्यासाठी पाटील यांच्या घराजवळ जिल्ह्णातून आलेले कार्यकर्ते जमा झाले होते. सकाळी दहा वाजल्यांपासून दुपारी तीनपर्यंत कार्यकर्ते एका ठिकाणी बसून होते. यावेळी भाजपच्या जिल्ह्णातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी भाषणात हसन मुश्रीफ यांच्यावर कडाडून टीका केली.
जिल्ह्णातील सर्व प्रश्न मंत्री पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुटण्याच्या मार्गावर आहेत. अशा पद्धतीनेच पाटील यांचा कामाचा धडका सुरू राहिल्यास आपले काही खरे नाही, या भीतीनेच जिल्ह्णाचे नेते म्हणून घेण्याची सवय लागलेल्या हसन मुश्रीफ यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या मानसिकतेतून निव्वळ स्टंटबाजीच्या हेतूनेच राष्ट्रवादीने पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची गाडी २६ वरून ६ वर येणार आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंटबाजी करणे राष्ट्रवादीने सोडून द्यावे, असे नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी सांगितले.
आमदार महाडिक यांची उपस्थिती
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानाजवळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिमोर्चाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी आमदार अमल महाडिक यांनी सकाळी दहा वाजता भेट दिली. त्यानंतर दुपारी मोर्चा सुरू झाल्यानंतरही ते पालकमंत्र्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चालाही सामोरे गेले.(प्रतिनिधी)