काळी-काळी मैना...डोंगराची मैनाचा आवाज घुमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:22 AM2021-04-16T04:22:44+5:302021-04-16T04:22:44+5:30

सदाशिव मोरे । आजरा काळी - काळी मैना....डोंगराची मैना म्हणून बाजारपेठ उपनगरे व मुख्य रस्त्यावर आवाज घुमू लागला आहे. ...

Black-black myna ... The sound of mountain myna reverberated | काळी-काळी मैना...डोंगराची मैनाचा आवाज घुमला

काळी-काळी मैना...डोंगराची मैनाचा आवाज घुमला

Next

सदाशिव मोरे । आजरा

काळी - काळी मैना....डोंगराची मैना म्हणून बाजारपेठ उपनगरे व मुख्य रस्त्यावर आवाज घुमू लागला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पडणाऱ्या वळीवाच्या पावसाने रानमेवा परिपक्व झाला आहे. काळ्या मैनांनी भरलेली टोपली घेऊन जागोजागी विक्रीसाठी आलेल्या धनगर समाजातील महिला व पुरुष यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी काळी मैना खरेदीसाठी लहान मुलांसह अबालवृद्ध आकर्षित होत आहेत.

आजरा तालुक्यात मार्चअखेर व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जंगलचा रानमेवा म्हणून प्रसिद्ध असणारी करवंदे, जांभळे, तोरणे, काजू यांचा बहर सुरू होतो. प्रतिवर्षी शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुटी पडते. त्यामुळे सुटीचा आनंद व काळी मैना खाण्यासाठी मुलांसह अबालवृद्धांची धडपड सुरू असते. याच दरम्यान पर्यटकांचीही गर्दी वाढलेली असते. गोवा व कोकणात जाणारे पर्यटकही या रानमेव्याचा आनंद लुटत असतात.

आजरा-आंबोली-गडहिंग्लज मार्गावर धनगर समाजातील अनेक महिला रानमेव्यांनी भरलेल्या टोपल्या घेऊन रानमेवा विक्री करीत असतात. आजरा शहरात व उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक नागरिक घरातच लॉकडाऊन झाले आहेत. मात्र, काळी मैना..डोंगरची मैना असा आवाज गल्लीबोळात घुमला की दारात येऊन खरेदीसाठी झुंबड उडत आहे. काळ्या मैनेला पाहून आपसूकच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते.

जंगली रानमेवा आणण्यासाठी धनगर समाजातील महिला पहाटेला जंगलात जाऊन रानमेवा टोपलीत गोळा करतात. विक्रीसाठी दुपारच्या सत्रात चालत आजऱ्यात घेऊन येतात. विक्री करून जमा झालेल्या तुटपुंज्या पैशांमधून ते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करतात. वर्षातून दोन महिने रानमेव्याच्या विक्रीवरच त्यांच्या वर्षाच्या जमाखर्चाचीदेखील बेगमी ठरलेली असते. चालूवर्षी वळीव पावसाने साथ दिल्याने रानमेवा मोठ्या प्रमाणात परिपक्व झाला आहे.

वणव्यामुळे रानमेवा होरपळला

तालुक्यातील शिरसंगी, किणे, वझरे, पेरणोली, वेळवट्टी, हाळोली परिसरातील खासगी व वनविभागाच्या जंगलांना लागलेल्या आगीत परिपक्व होण्यापूर्वीच रानमेवा होरपळला आहे. त्यामुळे जंगलात आतमध्ये जाऊन रानमेवा गोळा करावा लागत आहे.

* रानमेव्यावर प्रक्रिया उद्योगाची गरज

आजरा परिसरात मोठ्या प्रमाणात रानमेवा उपलब्ध होतो. वर्षातील दोन महिन्यांतच हा रानमेवा मिळतो. मात्र, अनेक वेळा तो न काढल्यामुळे जागेवरच पडून वाळून व कुजून जातो. त्यासाठी रानमेव्यावर प्रक्रिया उद्योगांची गरज आहे. तो झाल्यास वर्षभर आजरा परिसरातील चवदार रानमेवा चाखण्याची संधी मिळेल.

फोटो ओळी : आजऱ्याच्या बाजारात विक्रीसाठी टोपलीतून आलेली करवंदे. दुसऱ्या छायाचित्रात शेतकऱ्यांनी बोंडापासून वेगळा करण्यासाठी आणलेला काजू.

क्रमांक : १५०४२०२१-गड-०७/०८

Web Title: Black-black myna ... The sound of mountain myna reverberated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.