मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी काळा कोट खुंटीवर टांगू - प्रताप जाधव
By संदीप आडनाईक | Published: December 11, 2023 08:03 PM2023-12-11T20:03:15+5:302023-12-11T20:03:43+5:30
कोल्हापूर जिल्हा ग्राहक न्यायालय आणि वडार समाजाने दसरा चौकात सोमवारी मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाची लढाई कायद्याची आहे. त्यामुळे वेळ पडलीच तर अंगावरचा काळा कोट खुंटीला अडकवून आंदोलनात उतरेल, परंतू पळून जाणार नाही असे आश्वासन सोमवारी कोल्हापूर कंझ्युमर कोर्ट बार असोसिएशनने सकल मराठा समाजाच्या व्यासपीठावर दिले. कोल्हापूर जिल्हा ग्राहक न्यायालय आणि वडार समाजाने दसरा चौकात सोमवारी मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. तत्पूर्वी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी येथे साखळी धरणे आंदोलन केले. ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष ॲड. प्रताप जाधव यांनी या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला.
ॲड. इंद्रजित चव्हाण यांनीही २०२१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विवेचन करून, सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला. दरम्यान, वडार समाजाचे अध्यक्ष संजय शिंगाडे यांनी मराठा आणि वडार या दोन्हीही जाती सामाजिक, शैक्षणिक मागास आहेतच, परंतु आर्थिकदृष्ट्याही मागास आहेत असे सांगून राज्यकर्ते हेतूपुरस्सर दोन्ही जातींची प्रगती रोखत असल्याचा आरोप केला. यावेळी कंझ्युमर कोर्ट बार असोसिएशनचे सचिव राजेंद्र वायंगणकर, सहकार बार असोसिएशनचे सचिव किरण मुंगळे, उमेश माणगांवे, इंद्रजित चव्हाण, नेताजी पाटील, आशिष भुमकर, संदीप घाटगे, यशराज इंगळे, विजय पाटील, विशाल सरनाईक, किरण पाटील, अमोल पाटील, प्रशांत पाटील आणि कोल्हापूर वडार समाजातर्फे अध्यक्ष संजय शिंगाडे, रोहित पोवार, संदीप पोवार, विजय शिंगाडे, सुरेश साळोखे, गणपत पोवार आदी वकील उपस्थित होते.