रंकाळ्यावर रंगले कलांगण
By admin | Published: May 18, 2015 11:47 PM2015-05-18T23:47:03+5:302015-05-19T00:22:00+5:30
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय : लोककलेतून अपप्रवृत्ती विरोधात प्रबोधन
कोल्हापूर : गण-गवळण, तमाशा, शाहिरी, लावणी, कडकलक्ष्मी.. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंकाळ््यावर ‘कलांगण’ हा कार्यक्रम रंगला. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यभर ‘कलांगण’ हा लोककलांशी संबंधित कार्यक्रम केला जातो. कोल्हापुरात प्रतिज्ञा नाट्यरंगचे प्रशांत जोशी या उपक्रमाचे समन्वय करीत आहेत. रविवारी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँडच्या ‘नन्हा मुन्हा राही हूँ....’ व ‘सारे जहाँ से अच्छा...’ या गीतांच्या सुरावटीने झाली. त्यानंतर तमाशा या लोककलेच्या प्रकारातील गण-गवळण, लावणी यांचे सादरीकरण झाले. त्यानंतर ढोलकी सम्राट गौतमराव कोल्हापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांनी ‘कडकलक्ष्मी’ हे लोकनाट्य सादर केले.
या लोककलांच्या माध्यमातून संस्कृती-परंपरा यांच्या माहितीसोबतच स्त्री-भ्रूणहत्या, व्यसन, भ्रष्टाचार, सामाजिक अपप्रवृत्ती विरोधात प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाची सांगता पोलीस बँडच्या ‘कदम कदम बढाये जा...’ या गीताच्या सुरावटीने झाली. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. हा उपक्रम १५ जूनपर्यंत प्रत्येक रविवारी संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत सादर होणार आहे. तरी रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)