कोल्हापूर शहरातील ९० रेशन दुकानांत बोगस युनिटद्वारे काळाबाजार; एजंट, दुकानदार, अधिकाऱ्यांचाही सहभाग

By सचिन यादव | Published: July 8, 2024 04:14 PM2024-07-08T16:14:14+5:302024-07-08T16:15:56+5:30

अन्नधान्य वितरण कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

Black market through bogus unit in 90 ration shops in Kolhapur city | कोल्हापूर शहरातील ९० रेशन दुकानांत बोगस युनिटद्वारे काळाबाजार; एजंट, दुकानदार, अधिकाऱ्यांचाही सहभाग

संग्रहित छाया

सचिन यादव

कोल्हापूर : शिधापत्रिकेवर एकाच कुटुंबातील नावांऐवजी अन्य कुटुंबातील नावे घुसडून युनिट संख्या वाढवून त्यांच्या नावावर धान्य उचलून काळाबाजार सुरू आहे. ‘ई’ वॉर्डातील प्रतिभानगर परिसरातील एका अन्नधान्य वितरण दुकानात हा प्रकार सुरू आहे. या दुकानात सुमारे २२ रेशनकार्ड अशा प्रकारची असून शहरात सुमारे ९० हून अधिक दुकानांत ५०० हून अधिक रेशनकार्डावर बोगस युनिट दाखवून धान्याचा काळाबाजार केला जात आहे. या भ्रष्टाचाराला अन्नधान्य वितरण विभागातील अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे समजते. त्यासह या यंत्रणेत महिन्याला दुकानदाराकडून हप्ता घेणारे मोठे मासे मोकाट आहेत. त्यामुळे शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आहे.

कार्यालयाचा कारभार ऑनलाइन झाला असला तरी कामे अद्याप प्रलंबित आहेत. महा-ई-सेवा केंद्रातून आलेल्या ऑनलाइन अर्जानुसार कार्यालयात कामे केली जातात. त्रुटीही ऑनलाइन दाखविल्या जातात. मात्र, गेल्या सहा महिन्यांतून ऑनलाइन अर्जावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्र चालकही वैतागले आहेत. अर्ज केलेल्या नागरिकांना थेट वितरण कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यातून कर्मचारी आणि नागरिकांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत.

रेशनकार्डतील युनिट वाढ करणे, कमी करणे, त्यासह शुभ्र, केशरी, अंत्योदय कार्डातील फेरफारसाठी पहिला टप्पा म्हणून लिपिकाचे लॉगिन, त्यानंतर पुरवठा निरीक्षकांचे लॉगिन आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे लाॅगिन केल्यानंतर ओटीपी आल्यानंतर रेशनकार्ड मंजूर केले जाते. शहरात १६६ अन्नधान्य वितरण करणारी दुकाने आहेत. त्यापैकी ६० दुकाने खासगी आणि काही सहकारी तत्त्वावरील १०६ आहेत. दरम्यान, याप्रकरणी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

‘त्या’ रोजंदारी ऑपरेटरचा पुन्हा वावर

जुलै २०२३ मध्ये अन्यधान्य वितरण अधिकाऱ्याचे लॉगिन आयडी वापरून रेशनकार्डाच्या नावात फेरफार करणारा एक रोजंदारी ऑपरेटर होता. राजारामपुरीतील एका महिलेच्या कार्डात केलेल्या फेरफार प्रकरणात तो सापडला. त्यांच्या विरोधात तक्रारीनंतर भ्रष्टाचारात त्याचा मोठा हातखंडा असल्याचे उघड झाल्याने त्याला कामावरून काढून टाकले होते; मात्र त्याचा कार्यालयात पुन्हा वावर वाढला आहे.

कायमस्वरूपी अधिकारी हवा

अन्नधान्य वितरण कार्यालयात दररोज २५० नागरिक कामानिमित्त ये-जा करतात. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने रेशनकार्डाची अनेक कामे प्रलंबित आहेत. ओटीपी लवकर देत नसल्याने कामे खोळंबल्याच्या तक्रारी काही नागरिकांची आहेत. तर एक महिला लिपिक नागिरकांच्या अंगावरच धाऊन जाते. या कार्यालयात कर्मचाऱ्यांवरही कोणाचा वचक नाही. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नेमावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कामे प्रलंबित ठेवून काहींची करमणूक होत असली, तरी सर्वसामान्यांचे मात्र हेलपाटे वाढले आहेत.

  • एका रेशन दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, एक विशिष्ट यंत्रणा प्रत्येक दुकानदाराकडून महिन्याला १३०० रुपये गोळा करते. त्याचा वाटा ते पुढील यंत्रणेला देतात.
  • त्यातील ८०० रुपयांचा वाटा संबंधिताला दिला जातो. तर बाकीची उर्वरित रक्कमही यंत्रणेला पोहोच होते. तीन महिन्यांतून एकदा २० दुकानांची तपासणी केली जाते.
  • अनेकदा ही तपासणी कार्यालयातच बसून केली जात असल्याचे समजते. गोदामामध्ये शिल्लक धान्य, युनिट संख्येची पडताळणीकडे कानाडोळा केला जात आहे.
  • यामध्ये जोड आडनाव असलेली व्यक्ती, तसेच नावात साहेब असलेली व्यक्ती आणि त्याचे सहकारी आघाडीवर असल्याचे समजते.


इतके मिळते धान्य

शुभ्र कार्डावर काहीच धान्य मिळत नाही. केसरी कार्डावर ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू प्रतिमाणसी मिळतो. पिवळे कार्डावर (अंत्योदय) एकूण ३५ किलो धान्य दिले जाते. त्यामध्ये २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू दिला जातो. तर १ किलो साखर दिली जाते.

Web Title: Black market through bogus unit in 90 ration shops in Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.