कितीही ब्लॅकमेल करा; घाबरत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:24 AM2018-04-16T00:24:41+5:302018-04-16T00:24:41+5:30
कोल्हापूर : महापालिकेत घोडेबाजार थांबविण्यासाठी पक्षीय राजकारण आणले; पण दुर्दैवाने स्थायी सभापती निवडीत पुन्हा घोडेबाजार केला. या मंडळींना शहराच्या विकासासाठी नव्हे तर सत्ता दाखविण्यासाठी हवी आहे. सत्ता घेतल्यानंतर शहरातील प्रलंबित ड्रेनेजसाठी चारशे-पाचशे कोटी रुपये आणतील, असे वाटत होते; पण निधी राहू दे; त्यांनी आमचे दोन नगरसेवकच पळवले. पालकमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी पाचशे कोटी आणावेत, त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले. महापौरांनी आरोप केल्यानंतर मला ब्लॅकमेल केले जात आहे; पण सत्य बोलण्यास सतेज पाटील घाबरत नाही. माझी नियत स्वच्छ असल्याचा पलटवारही त्यांनी केला.
टिंबर मार्केट मॉडेल रस्त्याचे उद्घाटन रविवारी आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर हल्ला चढविला. पाटील म्हणाले, आम्हालाही नगरसेवक फोडायला जमते; पण कोणाला त्रास नको म्हणून करीत नाही. गेल्या सात वर्षांत १३०० कोटींचा निधी आणला. थेट पाईपलाईन, बसेस, ड्रेनेजचे काम केले, अजून शहराला ३२५ किलोमीटर ड्रेनेजची गरज आहे. त्यासाठी सत्ताधारी मंडळी ४००-५०० कोटी निधी आणतील, अशी अपेक्षा होती; पण ती फोल ठरली असून, हॉटेलच्या दारावरून जाताना जेवणाचा वास येतो, पण प्रत्यक्ष जेवण मिळत नाही, अशी भाजप सरकारची अवस्था झाली आहे.
सतेज पाटील म्हणाले, आयकर, विक्रीकराच्या कारवाईच्या भीतीने कोण बोलणार नाही. आमच्या महापौर परवा बोलल्या, त्यावरून मला ब्लॅकमेल केले जात आहे; परंतु सत्य आहे ते बोलण्यास सतेज पाटील घाबरत नाही. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. माझी नीतिमत्ता स्वच्छ आहे. मी जो करतो ते शहराच्या विकासासाठी आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा आम्ही भरपूर बघितली आहे. ती आम्हाला महत्त्वाची नाही. ३०-४० वर्षे या पदांमध्येच आहोत, श्रीमंती आमच्या घरची आहे. या गोष्टींचे आकर्षण आम्हाला नाही. माझे शहर चांगले झाले पाहिजे, एवढेच आकर्षण आहे. चुकत असेल तर कान धरा; पण चांगल्याला चांगले म्हणायला शिका, असा टोलाही त्यांनी लगावला. महापौर स्वाती यवलुजे, सागर चव्हाण, वनिता देठे, सुरेखा शहा, दिलीप पोवार, शारंगधर देशमुख, संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, तौफिक मुल्लाणी, हरिभाई पटेल, लक्ष्मीभाई पटेल, आदी उपस्थित होते.
सचिन चव्हाण यांनी स्वागत केले. वसंतराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी आभार मानले.
... तर आमदारकीचा राजीनामा...!
आम्हीही मंत्री होतो; पण प्रसारमाध्यमांना धमकी कधी दिली नाही. तसे दाखवा, आमदारकीचा राजीनामा देतो. लोकप्रतिनिधींना योग्य रस्त्यावर आणण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात. देशात दबावाचे राजकारण सुरू आहे; तेच कोल्हापुरात सुरू आहे; पण ही शाहूंची भूमी आहे. जनतेवर जेवढा दबाव टाकाल तेवढा उफाळून येतो, हा इतिहास आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना जनता सोडत नाही, माझ्या चुकाही दाखविण्याचे काम केल्याचे पाटील यांनी सांगितले.
आयुक्त दबावाला घाबरतात
सचिन चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करीत, टिंबर मार्केटमधील अंतिम लेआउटचे काम पूर्ण करा. आयुक्त तुमचे ऐकतील. गेले तीन-चार दिवस आयुक्त दबावाखालीच काम करीत असल्याचे पाहतोय; त्यामुळे ते तुमचे काम करतील, असे पाटील यांनी सांगितले.
थेट पाईपलाईनचा अतिरिक्त भार
थेट पाईपलाईनसाठी १० टक्के निधी महापालिकेने भरायचा होता, आता केंद्राने भूमिका बदलल्याने महापालिकेला ९० कोटी द्यावे लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.