बेळगावात काळ्यादिनी युवकांचा एल्गार
By admin | Published: November 2, 2016 01:14 AM2016-11-02T01:14:16+5:302016-11-02T01:14:16+5:30
महापौर, उपमहापौरांची उपस्थिती : हजारो मराठी भाषिक सायकल फेरीत सहभागी
बेळगाव : बेळगावमध्ये काळ्यादिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या सायकल फेरीत पुन्हा एकदा मराठी अस्मितेचे दर्शन घडले. संभाजी उद्यानातून सायकल फेरीला सुरुवात झाली. यामध्ये हजारो मराठी भाषिक या काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झाले होते.
गेली दोन वर्षे काळ्यादिनाच्या सायकल फेरीस दांडी मारणाऱ्या मराठी भाषिक महापौर, उपमहापौरांनी यावर्षी मात्र सायकल फेरीस हजेरी लावली. सकाळी ९ वाजता संभाजी उद्यानातून सायकल फेरीस सुरुवात झाली. नंतर बेळगाव उत्तर
भागातील काही भाग, शहापूर भागातून पुढे मराठा मंदिरात रॅली विसर्जित करण्यात आली. आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा शिवसेनाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चाचे सुरेश दादा पाटील यांनी हजेरी लावली होती.
महापौरांचे मौन
कर्नाटक सरकार कारवाई करील या भीतीने गेली दोन वर्षांत माजी महापौर किरण सायनाक आणि महेश नाईक यांनी काळ्यादिनाच्या फेरीत सहभाग दर्शविला नव्हता. मात्र, यावर्षी महापौर सरिता पाटील फेरीत सहभागी झाल्या होत्या. तोंडावर काळीपट्टी बांधून त्या सामील झाल्या होत्या. तर उपमहापौर संजय शिंदे सायकल फेरीत सहभागी झाले होते.
सोशल मीडिया आणि मराठा क्रांतीमुळे ऐतिहासिक गर्दी
ठिकठिकाणी कानडी आस्मितेचे लाल, पिवळे ध्वज लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोषणाबाजी करणाऱ्या मराठी युवकांवर बेळगाव पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला. सोशल मीडियावरून जनजागृतीमुळे काळ्यादिनी ५० हजारांहून अधिक लोकांची गर्दी ऐतिहासिक ठरली आहे.
युवकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घ्या : दीपक पवार
मराठा मंदिर येथे बोलताना मुंबई मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी निर्णय प्रक्रियेत युवकांना सामावून घेतले, तर सीमालढ्याला आणखीन बळकटी येईल असे सांगितले. यावेळी आमदार संभाजी पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर आदी नेते उपस्थित होते.