उजळाईवाडी पुलाखाली नाल्यात स्फोटकाच्या पिशव्या ; मित्राभोवतीच तपासाचा ससेमिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:32 PM2019-10-19T23:32:44+5:302019-10-19T23:35:59+5:30
हा दारूगोळा ते कोणाला देणार होते, त्याचा कशासाठी वापर केला जाणार होता, या संदर्भातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाच्या रस्त्याकडेच्या नाल्यात शनिवारी आणखी तीन स्फोटकांच्या पिशव्या पोलिसांना आढळून आल्या. त्या फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी दिल्या आहेत. ही स्फोटके कमी तीव्रतेची असून, फटाके बनविण्यासाठी दारूगोळा अॅल्युमिनियमच्या डब्यातून घेऊन जात असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. मृत चालक दत्तात्रय गणपती पाटील (वय ५६, रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) हे स्फोटामध्ये जागीच ठार झाले. त्यांचा मित्र आशिष आनंद चौगुले (रा. जाधववाडी) यांच्याकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यांच्या दोन्ही मोबाईलवरील कॉल डिटेल्सही पोलीस तपासत आहेत.
औट बॉम्ब बनविण्यासाठी वापरला जाणारा दारूगोळा पिशवीमध्ये मिळून आला आहे. त्यामध्ये तीन प्रकारची रासायनिक पावडर, कागदी पिशवी, अर्धवट जळालेले दोऱ्याचे तुकडे, पुंगळी यांचा समावेश आहे. हा दारूगोळा ते कोणाला देणार होते, त्याचा कशासाठी वापर केला जाणार होता, या संदर्भातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना स्फोट झाल्याने पोलीस हडबडले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, गोकुळ शिरगावचे सहायक निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह बॉम्बशोध पथक, दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाची जागा पाहिली असता संशयास्पद वस्तुस्थिती दिसून आली. प्रथमदर्शनी हा आत्मघाती हल्ला, पूल पाडण्याचा कट, मानवी जीवितहानी करण्याचा उद्देश असू शकतो का, या दृष्टीने तपास केला; परंतु स्फोटाची तीव्रता आणि सापडलेल्या अवशेषांवरून तसे काही दिसून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी मृत ट्रकचालक दत्तात्रय पाटील यांचा मित्र आशिष चौगुले यांच्या भोवतीच तपासाची चक्रे फिरविली आहेत.
चौगुले यांचाही ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. तसेच या ठिकाणी कोणी स्फोटकाचा डबा ठेवला होता का, या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. परिसरातील मोबाईल टॅकही तपासले जात आहेत. तसेच गोकुळ शिरगाव, शिरोली एमआयडीसी ते शिवाजी विद्यापीठ रोडवरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात आहेत. उड्डाणपुलाखालून जाणारा पादचारी रस्ता पोलिसांनी सील केला आहे.
स्फोटाची अशी शक्यता
चालक दत्तात्रय पाटील हे गोकुळ शिरगाव ते शिरोली एमआयडीसी अशी मालवाहतूक करीत होते. त्यांनी सोबत ही स्फोटके आणली असावीत. उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ येताच ट्रकचा अॅक्सल रॉड तुटल्याने तो पुलाच्या मधोमध असलेल्या फूटपाथला धडकला. त्यानंतर चालक पाटील यांनी मित्र आशिष चौगुले यांना फोन करून बोलावून घेतले. विधानसभा निवडणुकीमुळे सर्वत्र नाकाबंदी होती. वाहनांची तपासणी सुरू असल्याने भीतीपोटी पाटील हे स्फोटकांचा डबा ट्रकमधून फूटपाथच्या झाडीत लपवून ठेवत असताना स्फोट होऊन ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. त्यानंतर मित्र पाटील यांना हा प्रकार लक्षात आला. स्फोटकांच्या काही पिशव्या उजळाईवाडीच्या दिशेच्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यामध्ये मिळून आल्या आहेत. त्या कोणी टाकल्या त्यासाठी पोलिसांनी आशिष चौगुले यांच्याभोवतीच चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यांचे दोन्ही मोबाईल जप्त केले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. चौगुले यांच्या जबाबामधूनच या स्फोटाचे रहस्य उलगडण्याची दाट शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले.
अज्ञात व्यक्तीवर गुन्हा
उजळाईवाडीच्या हद्दीतून जाणाºया पुणे-बंगलोर महामार्गाजवळील कोल्हापूर शहराशी जोडणाºया उड्डाणपुलाखाली दत्तात्रय पाटील हे त्यांच्या नादुरुस्त झालेल्या ट्रकजवळ थांबले असताना ट्रकच्या पुढील बाजूस (उत्तरेस) पुलाखाली असलेल्या छोट्या सिमेंट कठड्याजवळील झुडपालगत अज्ञात व्यक्तीने स्फोटके ठेवलेल्या अॅल्युमिनियमच्या डब्यास त्यांचा धक्का लागताच स्फोट होऊन पाटील यांचा मृत्यू झाला. सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने स्फोटकांचा डबा ठेवणाºया अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम ३०४ सह स्फोटक अधिनियम १८०८ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आशिष आनंद चौगुले (वय ३७, रा. जाधववाडी, कोल्हापूर) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.
उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली झालेला स्फोट हा दहशतवादी प्रकार दिसून येत नाही. या स्फोटाचा तपास सुरू असून लवकरच यामागील उलगडा होईल.
- डॉ. अभिनव देशमुख : पोलीस अधीक्षक