देशी झाडेच बरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:57 PM2019-04-30T23:57:07+5:302019-04-30T23:57:11+5:30

भारत पाटील बेसुमार वृक्षतोडीमुळं आज समस्त मानवजातीबरोबरच सर्व सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. यामुळेच शाश्वत जीवनामध्ये झाडांचे स्थान अढळ ...

Bleeding native plants | देशी झाडेच बरी

देशी झाडेच बरी

Next

भारत पाटील
बेसुमार वृक्षतोडीमुळं आज समस्त मानवजातीबरोबरच सर्व सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. यामुळेच शाश्वत जीवनामध्ये झाडांचे स्थान अढळ आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही सर्वांसाठी काळाची गरज बनली आहे. अवर्षण, अतिवृष्टी, जागतिक तापमान वाढ, हवा प्रदूषण, जमिनीची धूप, पाण्याची पातळी व सजीव सृष्टीला लागणारा प्राणवायू ही फार मोठी समस्या सर्व जगासमोर ओढावली आहे. त्यावर मात करायची असेल तर सर्वांनी मनापासून झाडे लावली पाहिजेत व ती जगवलीच पाहिजेत. पर्यावरण व झाडांचे आता सगळ्यांना महत्त्व पटलं आहे; परंतु अजूनही कळतंय पण वळत नाही अशी मानसिकता सर्वांची दिसून येतेय.
आपलं जीवन व जीवसृष्टी वाचविण्यासाठी झाडं लावलीच पाहिजेत; पण ती कोणती लावावीत? विदेशी झाडांचे आकर्षण आपणाला होते, पण आता विदेशी झाडं का लावू नयेत? हे आपण सर्वांनी जाणून घेणं अतिआवश्यक आहे. मादागास्कर या देशातून भारतात गुलमोहर ही जात आली. आॅस्ट्रेलियामधून निलगिरी आली. सन १९७२ च्या दुष्काळात भारतात आलेल्या गव्हाबरोबर (मिलो) सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, फायकस, रेन ट्री, सप्तपर्णी ही झाडे आली. या झाडांचे आज कित्येक एकरांमध्ये प्लँटेशन झाले. यांच्या आम्लयुक्त पानांमुळे आजूबाजूची जमीनसुद्धा नापीक होत आहे. पक्षीसुद्धा या झाडांवर बसत नाहीत. भविष्यात आपण ही झाडे अजिबात लावू नयेत ही खबरदारी घेतलीच पाहिजे. दक्षिण अमेरिकेतून अन्नधान्य आयातीवेळी तिकडचे ‘पाथेर्णियम’ हे तण बी रूपात आपल्याकडे आले. त्यावेळीपासून सर्व भारतात या तणाचा अतिरेक झाला आहे. या तणाला आपण गाजर गवत व काँग्रेस गवत म्हणतो. त्यामुळे आपले शेतीचे खूप नुकसान होत आहे. विदेशी झाडांमुळे आपल्या सर्व सजीव जीवनचक्रावर गंभीर परिणाम होत आहे. या झाडांच्या फुलांमध्ये परागकण नसतात, त्यामुळे फुलपाखरे व इतर कीटक त्या झाडांवर येत नाहीत. या झाडांची मुळं जमिनीतील पाणी शोषून घेत असल्यामुळे पाण्याच्या पातळीवरसुद्धा परिणाम होत आहे. घार, कावळा, घुबड, गरुड, गिधाडे, वटवाघळे व चिमणी या पक्ष्यांचा वावर खूप दुर्मीळ झाला आहे. यामुळेच पक्ष्यांच्याद्वारे होणारे बीज प्रसाराचे कार्य होत नसल्यामुळे सूक्ष्मजीव, कीटक, किडे व पक्षी यांना जोडणारी निसर्गाची साखळी अत्यंत कमकुवत होत चालली आहे. परदेशी झाडांची पाने, फुले व शेंगा आपल्याकडील गायी, म्हशी, बैल, शेळी, मेंढी खात नाहीत. माकडाची जातसुद्धा विदेशी झाडावर बसत नाहीत. मुक्या प्राण्यांना पण विदेशी झाडांची घातकता समजली आहे. आपण बुद्धिवादी मानवजातीला मात्र अजून ती समजली नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे. निसर्गचक्रात सगळी सजीव सृष्टी अन्न व इतर गरजांसाठी एकमेकांवर अवलंबून असते. वृक्ष, वनस्पती, वेली, फळे व फुले यातूनच सगळ्यांचा जीवन निर्वाह होत असतो. परंतु या विदेशी झाडांमुळे ही अन्नसाखळीच खंडित झाल्यामुळे जंगली पशु, वाघ, हत्ती, गवे, बिबटे, माकडे हे प्राणी अन्नाच्या शोधात गावाकडे म्हणजे मानवी वसाहतीकडे येत आहेत. काही विषारी वनस्पती विषारी वायू उत्सर्जित करतात. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपला देश म्हणजे आयुर्वेदाची जन्मभूमी आहे. या विदेशी झाडांचा आयुर्वेदिक उपयोग शून्य आहे.
आपली भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या आयुर्वेद व योगाचे महत्त्व सर्व जगाला पटले आहे. आपली देशी झाडं व त्यांचे महत्त्वाची अगदी प्राचीन व पुराण काळापासून महिती आहे. झाडांना देव मानणारी व झाडांची पूजा करायची आपली भारतीय संस्कृती आहे. म्हणूनच देशी झाडं का लावायची व ती कोणती लावावीत हे आपल्या पुराणशास्त्रातसुद्धा लिहून ठेवले आहे. म्हणूनच ‘बेल’ हा वृक्ष काटेरी आहे, परंतु याच महत्त्व अत्यंत पवित्र आहे. या झाडाचे बेल फळ हे अत्यंत उपयुक्त व औषधी आहे, असं जेम्स वॉट या संशोधकाने लिहून ठेवले आहे. ‘बील्वे शण्डिल्यशैलूषौ मालूरश्रीफलावपी!’ याचा अर्थ बेलाचे फळ हेच खरे श्रीफळ आहे असे ‘अमरकोषात’ आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले आहे. ‘अश्वत्थमेकम पिचुमंदमेकम न्यग्रोधमेकम दष्चिण्चिणिक्म कपीथबील्व्म मल्क्त्रय्म पंचामृवापी नरकम प्श्चेत!’ अर्थात पिंपळ, कडूनिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंच १० झाडे किंवा बेल कवट आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची ५ झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही, असे आपल्या पूर्वजांनी शास्त्रात लिहून ठेवले आहे. वड, उंबर व बेल या झाडांना देवाचा दर्जा दिला आहे. बेल व तुळशीचे महत्त्व तर अत्यंत सात्त्विक व पवित्र आहे. आपला पश्चिम घाट तर आता जागतिक हेरिटेजमध्ये समावेशित आहे. आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिंपळ, मोहा, सीताफळ, रामफळ, सावर, पांगारा, कडुनिंब, करंज, बहावा, चिंच, आपटा, कोकम, पळस, फणस या जातीची झाडे लावली पाहिजेत. आता आपण गावकऱ्यांनी पुन्हा एकदा देवराई, आमराई, नक्षत्र वन, स्मृतिवन, बांबू वन व आॅक्सिजन पार्कची गावागावांत निर्मिती केली पाहिजे. देशी झाडांकडे डोळसपणे पाहू या तरच पर्यावरण वाचेल.
(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत)

Web Title: Bleeding native plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.