सत्तारूढ-विरोधकांना कलगीतुऱ्यात धन्यता
By admin | Published: May 29, 2017 12:36 AM2017-05-29T00:36:53+5:302017-05-29T00:36:53+5:30
सत्तारूढ-विरोधकांना कलगीतुऱ्यात धन्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील वाढीव वसाहती व उपनगरांसाठी नवीन भुयारी गटार योजना करण्याचे काम गेली पावणेतीन वर्षे चालू आहे. दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणारी ही योजना आता आणखी किती वेळ घेणार? याची खात्री नाही. त्याबाबत कालबद्ध नियोजन करण्याऐवजी भुयारी गटार योजनेच्या विषयावर आयोजित केलेली विशेष सभा रद्द केल्याच्या कारणावरून सत्तारूढ आणि विरोधकांत कलगीतुरा रंगू लागला आहे.
साधारणत: वीस वर्षांपूर्वी शहरामध्ये भुयारी गटार योजना करण्यात आली. त्यावेळी ही योजना गावभाग, मंगळवार पेठ, माळभाग अशा तत्कालीन शहरापुरती मर्यादित होती. ही योजना सन २००० पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. वीस दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या या योजनेतून सध्या सोळा दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया करणारा हा प्रकल्प आसरानगरजवळील कचरा डेपोलगत कार्यान्वित आहे.
सन २००० नंतर शहरातील वस्त्रोद्योगाचा विकास झपाट्याने होत गेला. साहजिकच शहरातील लोकसंख्या वाढत गेली. सध्या शहराची लोकसंख्या तीन लाख आहे. त्यामुळे शहराला लागणाऱ्या पाण्याची गरज वाढली. शहरामध्ये सध्या नळ योजनेमार्फत दररोज सुमारे ४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी साधारणत: ८० टक्के पाणी गटारीमार्फत वाहून जाते. म्हणजे ३२ दशलक्ष लिटर पाणी शहरातील गटारींतून वाहत जाते. त्यातील सोळा दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होते. उर्वरित सोळा दशलक्ष लिटर पाणी गटारीतून काळा ओढा व चंदूर ओढा या दोन्ही ओढ्यांतून आणि यशोदा नाल्यातून पंचगंगा नदीत मिसळते.
शहराच्या झालेल्या विकासाबरोबर वाढलेल्या वसाहती आणि उपनगरांसाठी भुयारी गटार योजना राबविण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला. त्यासाठी नवीन भुयारी गटार योजना राबविण्याचा ८२.७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे दिला. शासनाने तो मंजूर केला असून, दरम्यानच्या काळात भुयारी गटार योजनेच्या प्रकल्पाची किंमत वाढली असून, ९७.५ कोटी रुपये इतक्या खर्चाची ही योजना राबविण्यासाठी २८ आॅगस्ट २०१४ रोजी ‘व्हिस्टाकोअर’ या संस्थेला भुयारी गटार करण्याची निविदा सोपविण्यात आली आहे. नवीन भुयारी गटार योजनेसाठी ११० किलोमीटर लांबीचे नळ जमिनीखालून टाकण्यात येणार आहेत. या नळामार्फत जमा झालेले पाणी टाकवडे वेस येथे उभारण्यात येणाऱ्या प्रक्रिया प्रकल्पात एकत्रित आणून तेथे १८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.
अशा या योजनेबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (दि. २५) नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी यांनी विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, ही सभा अचानकपणे रद्द करण्यात आली. सभा रद्द झाल्यानंतर सत्तारूढ पक्षामधील भाजप, ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी कॉँग्रेस या घटक पक्षांमध्ये गोंधळ असल्याने सभा रद्द करावी लागली, असा आरोप विरोधी कॉँग्रेस पक्षाने केला. त्याला उत्तर देताना भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी, भुयारी गटार योजना कॉँग्रेसच्या राजवटीत सुरू झाली असून, त्यामध्ये ढपला पाडला गेल्याचा आरोप केला. त्याबाबत शासनाकडून चौकशी करू, असेही त्यांनी सांगितले.
या आरोपाला उत्तर देताना कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी, ढपला पाडल्याचा आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. तत्कालीन शहर विकास आघाडीचे सदस्य असलेल्या आणि आताच्या भाजपच्या पक्षप्रतोदांनी त्यावेळी या योजनेला मंजुरी देताना काय ‘अर्थ’ घेतला, याचा खुलासा करावा, असा टोला लगावला. तर चांगले सर्व आम्हीच केले, असा कांगावा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न थांबवावा, अशीही टीका केली.
वास्तविक पाहता दोन वर्षांचा कालावधी असलेली ही भुयारी गटार योजना लांबत चालली असून, पावणेतीन वर्षांत अवघे साठ टक्के काम झाले आहे. दरम्यानच्या काळात या योजनेची आणखीन किंमत वाढली असून, त्याचा कोट्यवधी रुपयांचा बोजा नगरपालिकेवर पडणार
आहे.
अशा स्थितीत सत्तारूढ व विरोधक यांनी एकत्रितपणे विचारविनिमय करावा आणि समन्वयाने योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी नियोजन करावे, अशी अपेक्षा असताना सध्या सत्तारूढ व विरोधक दोन्हीकडूनही रंगू लागलेल्या कलगीतुऱ्याबाबत नागरिकांत नाराजी आहे.
साठ टक्के काम पूर्ण; प्रक्रिया केंद्राचा पत्ताच नाही
आॅगस्ट २०१४ मध्ये भुयारी गटार योजना करण्याच्या निविदेला वर्क आॅर्डर देताना सदरचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची कालमर्यादा होती. या योजनेला आता पावणेतीन वर्षे होऊन गेली. तरी सध्या साठ टक्के नळ जमिनीखालून टाकण्याचे काम झालेले आहे. कमला नेहरू वसाहत, यशवंत कॉलनी परिसर, स्वामी मळा, करवीर नाका परिसर, जवाहरनगर, गणेशनगर- दत्तनगर, शहापूर, जय सांगली नाका परिसर, सांगली रस्ता अशा परिसरांमध्ये व्हिस्टाकोअर संस्थेने जमिनीखालून नळ टाकण्याचे काम पूर्ण केले आहे, तर उर्वरित ४० टक्के परिसरामध्ये अद्याप नळ टाकण्याचे काम अपूर्ण आहे. याशिवाय टाकवडे वेस येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा अद्याप पत्ता नाही.