भविष्याच्या स्वप्नासाठी अंधांचा रोजगार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:38 AM2019-05-30T11:38:23+5:302019-05-30T11:40:49+5:30
काहींना काही अंशी, तर काहींना अजिबात दिसत नाही. अशा अंध सुशिक्षितांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड (नॅब)तर्फे बुधवारी सकाळी अंधांचा रोजगारविषयक मेळावा संस्थेच्या शाहूपुरी चौथी गल्ली येथील कार्यालयात आयोजित केला होता. त्यात ६० अंध युवक-युवतींनी सहभाग घेत भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन घेतले.
कोल्हापूर : काहींना काही अंशी, तर काहींना अजिबात दिसत नाही. अशा अंध सुशिक्षितांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड (नॅब)तर्फे बुधवारी अंधांचा रोजगारविषयक मेळावा संस्थेच्या शाहूपुरी चौथी गल्ली येथील कार्यालयात आयोजित केला होता. त्यात ६० अंध युवक-युवतींनी सहभाग घेत भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन घेतले.
या मेळाव्यात जिल्हाभरातून ६० हून अधिक दहावी ते अगदी एम. बी. ए. संगीत विशारद असे शिक्षण घेतलेले अंध बेरोजगार सहभागी झाले होते. यात संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. नोकरीच्या संधी कोणत्या विभागात आणि व्यवसायाच्या संधी कोठे उपलब्ध आहेत, याविषयी मार्गदर्शन केले.
याशिवाय आपआपल्या गावात व्यवसायासाठी कोणत्या संधी आहेत. याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गुुणवंत विद्यार्थिनींकरिता १.५० लाखांची शिष्यवृत्ती या संस्थेमार्फत १९९८ पासून दरवर्षी दिली जाते. ज्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, त्यांना संस्था शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणासाठी प्रेरणा देत आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोहन शंकर लाखे (राजेंद्रनगर), मंजिरी सुरेश मर्दाने (करवीर), इंद्रजित तात्यासाो कोळी (हातकणंगले), सायली लुगारे (साजणी) यांचा बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी विजय रेळेकर, दीपक बोगार, आदी उपस्थित होते.