सर्व भक्तांना गाभारा प्रवेशास मनाई करा
By admin | Published: April 13, 2016 12:32 AM2016-04-13T00:32:58+5:302016-04-13T00:35:38+5:30
गजानन मुनिश्वर, शिवकुमार शिंदे यांची याचिका
कोल्हापूर : गेले काही दिवस अंबाबाई गाभारा प्रवेशावरून वाद सुरू आहे. मूर्तीच्या सुरक्षेकरीता सर्वच भक्तांना गाभाऱ्यात प्रवेश देऊ नये, अशी याचिका दिवाणी न्यायालयात दाखल केल्याची माहिती गजानन विश्वनाथ मुनिश्वर यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुनिश्वर यांनी म्हटले आहे की, अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात लोकांच्या श्वासोच्छवासामुळे प्रचंड प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईडची निर्मिती होते. त्यामुळे मूर्ती खराब झाली आहे. गाभारा छोटा असल्याने त्यास एकही खिडकी नाही. पंखा आहे, मात्र अशुद्ध हवा तेथेच फिरते. काहीवेळा श्वासोच्छवासाच्या त्रासाने भक्तांवर औषधोपचारही करावे लागले आहेत. सन २००६ च्या पाडव्यादिवशी एक भक्त मृतदेखील झाला. तसेच मुक्त प्रवेशामुळे दर्शनरांग तासन्-तास रेंगाळत राहते याबाबत तत्कालीन पोलिस अधीक्षक यशस्वी यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात येथे चेंगराचेंगरीसारखा प्रकार उद्भवू शकतो. छोट्या गाभाऱ्यामुळे भक्तांच्या स्वतंत्रपणे तपासणी करण्याची सोय करता येत नाही. त्यामुळे महिलांना गाभाऱ्यात दर्शन देणे उचित ठरणार नसल्याचे म्हटले आहे. त्यातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज, बुधवारी ५०० महिलांसह गाभाऱ्यात जाण्याची धमकी दिली आहे. या सर्व कारणांनी मूर्तीची सुरक्षितता महत्त्वाची मानून पुजारी व मदतनीसांना सोडून अन्य कोणालाही प्रवेश देऊ नये म्हणून कायम मनाई ताकीद करावी.
या याचिकेबाबत सुनावणी दि. १६ एप्रिलला होणार आहे.