रंकाळ्याला दूषित पाण्याचा विळखा

By admin | Published: November 21, 2014 11:32 PM2014-11-21T23:32:57+5:302014-11-22T00:04:13+5:30

ड्रेनेजलाईन चोकअप : पुन्हा जलपर्णीचा धोका

Block the contaminated water in the rainy season | रंकाळ्याला दूषित पाण्याचा विळखा

रंकाळ्याला दूषित पाण्याचा विळखा

Next

कोल्हापूर : रंकाळ्यात मिसळणाऱ्या शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाल्यातील ११ ते १२ एमएलडी मैलामिश्रीत सांडपाण्यापैकी तब्बल २२१० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविल्याचा मनपाचा दावा फोल ठरला आहे. सव्वाचार कोटी रुपये खर्चून टाकलेली ड्रेनेजलाईन पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. पाईपमधील खरमाती काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच रंकाळ्याची सांडपाण्यातून मुक्तता होईल. सांडपाण्यामुळे रंकाळ्याला पुन्हा जलपर्णीचा धोका वाढल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.
रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याची राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून महापालिकेला ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला. साडेचार वर्षे ही योजना रखडली. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम कासवगतीने झाल्याने दुखणे वाढतच गेले. जुलै २०१४ मध्ये नाल्यातील पाणी वळविल्याचा दावा प्रशासनाने केला. मात्र, अद्यापही रंकाळ्यात सांडपाणी मिसळत आहे.
पद्माराजे उद्यानाच्या पाठीमागे पाईपमधील खरमाती काढण्यासाठी तीन-चार ठेकेदारांनी प्रयत्न करूनही पाईप पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. तरी पाईपलाईन सुरळीत झाल्याचे जाहीर केले. सरनाईक कॉलनी नाल्यातील एक ते दीड एमएलडी सांडपाणी वळविण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)


जुजबी प्रयत्न
रंकाळ्यात सरनाईक कॉलनीतून मिसळणारे पाणी रोखण्यासाठी मातीची पोती भरून दूषित पाणी वेगळे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. या पाण्याला दुर्गंधी व जलपर्णी वाढली आहे. हे पाणी केव्हाही रंकाळ्यात मिसळू शकते, अशी अवस्था आहे. अशा जुजबी प्रयत्नांवरच प्रशासनाची भिस्त असल्याने त्याचा फटका बसू शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.
स्वच्छतेचा बोजवारा
रंकाळा पदपथ उद्यानात सात ते आठ कर्मचारी आहेत; पण उद्यानात स्वच्छता दिसून येत नाही. कचरा कुंडीची योग्य व्यवस्था नाही. पर्यटकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. महापालिकेने तीनवेळा रंकाळ्यासाठी एक दिवस ही स्वच्छता मोहीम राबविली; पण त्याची नित्य स्वच्छता होणे गरजेचे आहे.

Web Title: Block the contaminated water in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.