वीज बिल माफीसाठी शुक्रवारी राज्यभर महामार्ग रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:23 AM2021-03-14T04:23:16+5:302021-03-14T04:23:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १९) राज्यभर महामार्ग ...

Block state highways on Friday for electricity bill waivers | वीज बिल माफीसाठी शुक्रवारी राज्यभर महामार्ग रोको

वीज बिल माफीसाठी शुक्रवारी राज्यभर महामार्ग रोको

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १९) राज्यभर महामार्ग रोको करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची, हा विधिमंडळाचा अवमान आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांची चेष्टा चालविल्याचा आरोपही त्यांनी केला.

लॉकडाऊनच्या काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, शिवसेना, ‘माकप’, ‘शेकाप’ , जनता दल, जनसुराज्य’ आदी पक्ष व संघटनांनी गेले दोन-तीन महिने आंदोलन सुरू केले आहे.

केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांनी घरगुती वीज बिलांमध्ये सहा महिन्यांसाठी ५० टक्के सवलत दिली आहे. कर्नाटक सरकारने रिक्षाचालक, टॅक्सीचालक, फळभाजी विक्रेते, बांधकाम व यंत्रमाग कामगार घटकांना रोख मदत दिली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने काहीच केलेले नाही, ही बाब खेदजनक असून सरकारला जागे करायचे आहे. १९ मार्च रोजी यवतमाळ येथील साहेबराव करपे या पहिल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, त्याच दिवशी राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

यावेळी, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील-किणीकर, उदय नारकर, संदीप देसाई, संभाजीराव जगदाळे, समीर पाटील, शिवाजी माने, शरद पाटील, आदी उपस्थित होते.

बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा

वीज बिलाप्रश्नी बुधवारी (दि. १७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षियांना घेऊन चर्चा करणार असल्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. मुख्यमंत्री यावर निश्चितच तोडगा काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Block state highways on Friday for electricity bill waivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.