इचलकरंजीत पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:53+5:302021-08-12T04:29:53+5:30
इचलकरंजी : अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने सिद्धार्थ हौसिंग सोसायटी परिसरातील संतप्त बनलेल्या नागरिकांनी मंगळवारी भाग्यरेखा चित्रपटगृहासमोर रास्ता रोको आंदोलन ...
इचलकरंजी : अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने सिद्धार्थ हौसिंग सोसायटी परिसरातील संतप्त बनलेल्या नागरिकांनी मंगळवारी भाग्यरेखा चित्रपटगृहासमोर रास्ता रोको आंदोलन केले. या मार्गावरील आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
याची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष तानाजी पोवार व पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
जलशुद्धीकरण केंद्राजवळच असलेल्या सिद्धार्थ हौसिंग सोसायटीत गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष पोवार व सभापती सुर्वे यांच्यासह अधिकारी दाखल झाले. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांंनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.