इचलकरंजीत पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:57+5:302021-03-18T04:22:57+5:30
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अवेळी पाणी सोडले जाते. जरी पाणी सोडले तरी ...
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अवेळी पाणी सोडले जाते. जरी पाणी सोडले तरी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. या सततच्या त्रासाला कंटाळून मंगळवार पेठेतील महिलांनी महात्मा गांधी चौकात एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. शहरातील मुख्य मार्गावरील चौकात आंदोलन केल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. याची माहिती मिळताच नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती सुर्वे व अधिकारी बाजी कांबळे आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त महिलांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत पाणी सोडणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी भूमिका महिलांनी घेतली. सभापती सुर्वे यांनी आंदोलक महिलांना पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन स्थगित केले.
चौकट
दोन आठवड्यांत तीन वेळा रास्ता रोको
शहरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. ४ मार्चला सकाळी मरगूबाई मंदिराच्या परिसरात, त्याच दिवशी नारायण चित्रपटगृहजवळ, तर बुधवारी महात्मा गांधी चौकात महिलांनी पाण्यासाठी रास्ता रोको केला. दोन आठवड्यांत तीन वेळा पाण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
फोटो ओळी
१७०३२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीतील मंगळवार पेठ परिसरातील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी गांधी पुतळा चौकात रास्ता रोको आंदोलन केले.