‘थर्टी फर्स्ट’ पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात नाकाबंदी, ड्रंक अॅँड ड्राईव्ह : हॉटेलची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:16 PM2018-12-31T14:16:30+5:302018-12-31T14:22:50+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात वर्षअखेरीस गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याने पोलिसांसमोर ‘थर्टी फर्स्ट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात नाकाबंदी, वाहतूक व्यवस्थेसह हॉटेल-लॉजेसची तपासणी, ड्रंक अॅँड ड्राईव्हद्वारे मद्यप्राशन करून गोंगाट करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली.
कोल्हापूर : जिल्ह्यात वर्षअखेरीस गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याने पोलिसांसमोर ‘थर्टी फर्स्ट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात नाकाबंदी, वाहतूक व्यवस्थेसह हॉटेल-लॉजेसची तपासणी, ड्रंक अॅँड ड्राईव्हद्वारे मद्यप्राशन करून गोंगाट करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली.
देशी-विदेशी मद्यांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाईची मोहीम आखली आहे. कोरेगाव-भीमाच्या पार्श्वभूमीवरही विशेष दक्षता घेण्यात आली आहे. शहरात सुमारे ३०० अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यांवर उतरले आहेत.
वर्षभरात खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, चोरी, घरफोडी, हाणामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर ‘थर्टी फर्स्ट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसेच कोरेगाव-भीमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी रविवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
‘थर्टी फर्स्ट’दिवशी उत्साही तरुण मद्यप्राशन करून सुसाट वेगाने वाहने चालवीत मोठमोठ्याने ओरडत जात असतात. अशा वेळी अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर काही हॉटेल्समध्ये आॅर्केस्ट्रा व डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्य करीत असताना महिलांची किंवा तरुणींची छेडछाड होऊन जल्लोषाला गालबोट लागू शकते.
आपापल्या सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना हॉटेल व रिसॉर्ट मालकांना देण्यात आल्या. पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार प्रत्येक हॉटेलची कसून तपासणी सुरू आहे.
शहरालगतच्या उपनगरांसह ग्रामीण भागांतील गावठी हातभट्ट्यांवर कारवाईसत्र सुरू ठेवले आहे. रविवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून ‘ड्रंक अॅँड ड्राईव्ह’विरुद्ध मोहीम कडक राबविण्यात येत आहे.
मैदाने, सोसायटी परिसरात बंदी
सार्वजनिक मैदाने, गृहनिर्माण सोसायटी परिसरात पार्ट्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. यासंबंधी एखादी तक्रार दाखल झाल्यास गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली असल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.
नागरिकांनी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जल्लोष करावा, आनंद घ्यावा; परंतु आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. मद्यप्राशन करून गोंगाट करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. अभिनव देशमुख,
पोलीस अधीक्षक