हा तर दाभोलकरांच्या विचारांचा खून
By Admin | Published: July 23, 2014 10:40 PM2014-07-23T22:40:08+5:302014-07-23T22:41:08+5:30
‘अंनिस’ कार्यकर्ते आक्रमक : आता तरी अनास्था सोडा; पोळ व इतरांवर कारवाई करा
सातारा : अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करताना त्यांच्याच आत्म्याला पाचारण करण्याचा प्रकार चित्रफितीद्वारे उघड झाला आहे. हा दाभोलकरांच्या विचारांचा खून आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली. ही चित्रफीत प्रदर्शित झाल्यापासून ‘अंनिसचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले असून, पोळ आणि इतरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करीत आहेत.
पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी जादूटोण्याचा मार्ग स्वीकारला होता, हे पत्रकार आशिष खेतान यांनी जारी केलेल्या चित्रफितींमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोळ यांच्यावर आता शासनाने कारवाई केलीच पाहिजे, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आग्रह धरला आहे.
सातारा हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा बालेकिल्ला आहे. डॉ. दाभोलकर यांनी येथूनच अंधश्रद्धांचा नायनाट करण्याच्या विवेकवादी चळवळीची सुरुवात केली. त्यामुळे सातारचे कार्यकर्ते पोळ यांचा व्हिडिओ पाहून अधिक आक्रमकपणे त्यांच्यावर कारवाईची मागणी करू लागले
आहेत.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, मुंबई पोलीस अॅक्टमध्ये पोलिसांनी तपास किंवा कारवाई कशी करावी, याबद्दल एक स्पष्ट चौकट आखून दिली आहे. त्यात अशा बुवाबाजीला थारा नाही. तसेच देशाच्या घटनेनुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य मानले गेले आहे. पोलीस दलासारख्या यंत्रणेत या दोहोंचे उल्लंघन होणे गंभीर असून, नियमानुसार कारवाई करणे ही जबाबदारी राज्य शासनाची आहे. पोळ यांनी निवृत्त हवालदार मनीष ठाकूर आणि आदीनकर यांच्या मदतीने प्लँचेटसारखे उपाय तपासकामी वापरल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’मधून उघड झाले आहे. गृहखाते यापूर्वी तसे पुरावे मागत होते. आता पुरावे समोर असल्यामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अनास्था सोडून याप्रकरणी कठोर कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
लोकआयोग स्थापून
याचिका दाखल करू
समितीने यापूर्वीच पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात पोळ व इतरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच, दौंड पोलीस ठाण्यात मनीष ठाकूर आणि आदीनकर यांच्याविरुद्ध रीतसर फिर्याद दिली आहे. या तक्रारींवर कारवाई होणार नसेल, तर समिती लोकआयोग तयार करेल आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करेल, असे समितीचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पोतदार यांनी सांगितले.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या घटनेसंदर्भात दाखविलेली कमालीची उदासीनता अत्यंत वेदनादायी आहे. तीन आठवडे उलटून गेले तरी ‘प्लँचेट’ प्रकरणाची साधी चौकशीही होत नाही, यातून सत्य लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका येते. हा डॉक्टरांच्या विचारांचा खून असून, आता पुरावे समोर आले आहेत. आता तरी निष्पक्ष चौकशी केली जावी आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रकाराबद्दल संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत.
- डॉ. हमीद दाभोलकर