समस्त मुस्लीम समाजातर्फे ८ जुलै रोजी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:20+5:302021-07-02T04:16:20+5:30
कोल्हापूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील समस्त मुस्लीम समाजातर्फे येत्या मंगळवारी (८ जुलै) दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंगच्या ...
कोल्हापूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील समस्त मुस्लीम समाजातर्फे येत्या मंगळवारी (८ जुलै) दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंगच्या हॉलमध्ये सकाळी साडे दहा ते दुपारी दोन यावेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी बोर्डिंगच्या सभागृहात झालेल्या बैठकीत जास्तीत जास्त मुस्लीम बांधवांनी रक्तदान करून रक्ताच्या टंचाई दूर करण्याच्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यास संपूर्ण राज्यात रक्ताची तीव्र टंचाई जाणवत असून ही टंचाई दूर करण्यासाठी ‘लोकमत’ समुहाने संपूर्ण राज्यात ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या उपक्रमात विविध संस्था, तालीम मंडळे, ग्रुप सहभागी होत आहेत. कोल्हापुरातील मुस्लीम समाजानेही यामध्ये सहभागी व्हायचे ठरविले आहे.
या शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जहॉंगीर अत्तार, अल्ताफ झांजी, रफिक मुल्ला, मलिक बागवान, रफिक शेख यांच्यासह विविध जमातीचे प्रमुख मुस्ताक मलबारी (राजेंद्रनगर), बंकट थोडगे (गगनबावडा), मुसा जमादार ( जमात ए इस्लामिक हिंद), जमाल मुल्ला (अकबर मोहल्ला), नासीर हुसेन मुजावर ( फुलेवाडी), वसीम बागवान ( बागवान समाज), इलियाज बागवान (लक्षतीर्थ वसाहत), मुख्याध्यापक नेहरू हायस्कूल एच. एम. काझी, शिरोली हायस्कूलचे एच. एम. मोमीन, ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सुचिता खटावकर-मंडलिक, हमीद महात (बडी मस्जिद्द बिंदू चौक) बापू मुल्ला (ओबीसी संघटना) तन्वीर बेपारी (सदरबाजार) आदी उपस्थित होते.
कोट -
राज्यावर कोरोना महामारीचे संकट आहे. रक्ताचा तुटवडा जाणवात आहे. अशा कठीण प्रसंगात मुस्लीम समाजाने दुसऱ्याच्या मदतीला धावून गेले पाहिजे. रक्तदानासारख्या पवित्र कार्यात समस्त मुस्लीम समाजाने सहभागी व्हावे.
कादर मलबारी, प्रशासक
कोट -
प्रत्येक संकटावेळी मुस्लीम समाजाने आपले कर्तव्य बजावून संकटग्रस्त समाजाबद्दल आपुलकीची भावना जोपासली आहे. रक्त टंचाई दूर करण्याच्या हेतूने आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी व्हावे.
गणी आजरेकर.