लहू ढेकणेच्या कू्रर मानसिकतेने नायकुडे कुटुंब उद्ध्वस्त
By admin | Published: May 26, 2015 12:20 AM2015-05-26T00:20:30+5:302015-05-26T00:48:33+5:30
दत्ताजीचा हकनाक बळी : दारूचे व्यसन नडले; घरातील कर्ता पुरुष गेला; आता दाद मागायची तरी कोणाकडे ?
एकनाथ पाटील - कोल्हापूर -सेंट्रिंगची कामे करताना दत्ताजीला सहकाऱ्यांमुळे दारूचे व्यसन जडले. दिवसभर काम आणि रात्री दारू अशी त्यांची दिनचर्या. व्यसनाधीन असला तरी संसाराचा गाडा त्याच्या मजुरीवरच चालायचा. मात्र या व्यसनामुळे इतके क्रूर मरण येईल, असे त्याने स्वप्नातही पाहिले नसेल. त्याचे अंत्यसंस्कार करणेही त्याच्या कुटुंबाच्या नशिबी आले नाही आणि हातावर पोट असलेले त्याचे कुटुंबही उद्ध्वस्त झाले.
दत्ताजी नायकुडे यांचे सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे कौलारू छोटेखानी घर आहे. तीन वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरवले. परिस्थिती अत्यंत गरिबीची, घरामध्ये आई शांताबाई, भाऊ प्रकाश, पत्नी संजीवनी, मुलगी शीतल, मुलगा ओंकार असे मिळून एकत्र राहतात. वडील गवंडी काम करत होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासून गवंडी कामाची आवड, हाच व्यवसाय पुढे त्यांनी चालविला. त्यातून त्यांनी दोन मुलींचे विवाह केले. सध्या त्यांची मुलगी शीतल (वय १६) दहावी, तर मुलगा ओंकार (१२) सातवीमध्ये शिकत आहेत. दत्ताजी सुरुवातीस निर्व्यसनी होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ व प्रामाणिक होता. काही वर्षांपूर्वी कामावरील सहकाऱ्यांच्या संगतीतून त्यांना दारूचे व्यसन जडले आणि त्यामध्ये ते वाहत गेले.
गेल्या आठवड्यात घरामध्ये नातेवाइकाच्या लग्नाची तयारी सुरू होती. लग्नाच्या धांदलीत सर्वजण मग्न असताना शुक्रवारी १५ मे रोजी ते कामाला जातो म्हणून घरातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी लग्नाची तयारी करण्यासाठी लवकर येतो, असेही पत्नीला सांगितले. परंतु, त्या रात्री ते घरी आलेच नाहीत. कामावर गेल्यावर चार-चार दिवस ते घरी येत नसल्याने नातेवाइकांनी शोधाशोधही केली नाही. इकडे मात्र लहू ढेकणे हा त्यांचा यमदूत बनून सज्ज होता. त्याने स्वत:च्या जमिनीमध्ये झाडे लावण्यासाठी खड्डे खोदायचे आहेत, अशी बतावणी करून दत्ताजींना दुचाकीवरून गिरगावच्या माळरानावर नेले. भरपूर दारू पाजून पुरते ‘लोड’ केले. याठिकाणी कोयत्याने त्याचे शीर कापले, त्यानंतर हाताचे पंजेही तोडले. दत्ताजीची ओळख पुसून तोच लहू ढेकणे आहे असा चित्रपटात शोभेल असा बनाव त्याने केला.
आपल्या धन्याचा खून झाला आहे, याची पुसटशीही कल्पना पत्नीला नव्हती. बाबा कुठे आहेत, अशी कोणी विचारणा केली, तर दोन्ही मुले कामावर गेली आहेत, असे सांगत होती. गेले चार दिवस सीपीआरच्या शवागृहात मृतदेह पडून होता. अखेर पोलिसांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
दत्ताजीचा असा खून झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दाद मागायची कोणाकडे? असा काय गुन्हा केला होता त्यांनी, की त्यांचा क्रूरपणे खून करण्यात आला. या नातेवाइकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना पोलीसही अवाक झाले.
निष्पापांचा घेतला बळी :
२९ नोव्हेंबर १९९९- संकेत सूर्यकांत भांडे
४ जुलै २०००- अमित चंद्रकांत सोनवणे
१६ मे २०१५- दत्ताजी पांडुरंग नायकुडे
स्वत:चे अस्तित्व लपविण्यासाठी लूह ढेकणेंने घेतला दत्ताजीचा बळी