कारागृहातून बाहेर पडणार म्हणूनच खून-: कैदी जाधव याची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:38 PM2019-07-06T12:38:30+5:302019-07-06T12:44:59+5:30
नात्यातील मुलीवर सामूहिक अत्याचार करून निर्दोष सुटणार असल्याच्या रागातून कैदी सुनील मारुती माने (वय ३५, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली संशयित कैदी परमेश्वर ऊर्फ देवा नानासाहेब जाधव (वय २४, रा. कोडेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने दिली.
कोल्हापूर : नात्यातील मुलीवर सामूहिक अत्याचार करून निर्दोष सुटणार असल्याच्या रागातून कैदी सुनील मारुती माने (वय ३५, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली संशयित कैदी परमेश्वर ऊर्फ देवा नानासाहेब जाधव (वय २४, रा. कोडेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने दिली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सुनील माने याच्यावर नातेपुते पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद होता. त्याने जाधव याच्या नात्यातील मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याने ९ डिसेंबर २०१८ पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता; तर परमेश्वर ऊर्फ देवा जाधव हा ‘मोक्का’तील आरोपी आहे. माने याच्या नातेवाइकांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी मध्यस्थी करून हे प्रकरण न्यायालयातून मिटविण्याचे ठरविले होते. तशी तयारी दोन्ही बाजूंनी केली होती. माने हा अत्याचार करून पुन्हा खुलेआम गावात फिरणार हे माझ्या बुद्धीला पटत नव्हते. त्या सुडातून २७ जूनला मानेच्या डोक्यात दगड घालून खुनी हल्ला केल्याची कबुली संशयित जाधव याने दिली आहे. दरम्यान, नातेपुते गावात ९१ गुंठे शेतजमीन आहे. या वादातूनच सुनीलला सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप करीत, सुपारी देऊन त्याचा खून केल्याचे बंधू अनिल माने यांनी पोलिसांना सांगितले होते. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. आज, शनिवारी त्याला कारागृहात तपासासाठी फिरविले जाणार आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.
प्रार्थना व खूनही
संशयित कैदी जाधव याचे सुनिल माने याच्याशी कारागृहातील वर्तन चांगले होते. गेल्या कांही दिवसांत ते दोघे सकाळ-सायंकाळच्या प्रार्थनेलाही एकत्रित जात होते. त्यातून सलोखा वाढवून जाधव याने अत्यंत नियोजनबध्दपणे हा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यासाठीचा दगडही त्याने आधी हेरून ठेवला होता. कारागृहातील सीसीटीव्हीमध्ये याचे चित्रीकरणही झाले आहे.