CoronaVirus : रक्तपेढ्यात रक्त झाले उदंड, रक्तदान शिबिरे केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:00 PM2020-06-09T12:00:41+5:302020-06-09T12:05:26+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त उदंड झाले असून, सर्वांनी रक्तदान शिबिरे बंद केली आहेत. बारा रक्तपेढ्यात तब्बल ३९२२ पिशव्या रक्त असून, रुग्णालयातून अपेक्षित मागणी नसल्याने ते पडून राहिले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त उदंड झाले असून, सर्वांनी रक्तदान शिबिरे बंद केली आहेत. बारा रक्तपेढ्यात तब्बल ३९२२ पिशव्या रक्त असून, रुग्णालयातून अपेक्षित मागणी नसल्याने ते पडून राहिले आहे.
दातृत्वाच्या बाबतीत कोल्हापूरकरांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यातही रक्तदान म्हटले तर येथे रक्तदानाची शंभरी पार करणारे अनेकजण भेटतात. प्रशासन अथवा रक्तपेढ्यांनी नुसते आवाहन केले की, हजारो पिशव्या रक्त संकलन होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात रक्ताची मागणी कमी राहिली.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठड्यात राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये काहीसी शिथिलता दिल्याने नागरिकांनी नियोजित शस्त्रक्रियांसाठी रुग्णालये गाठली. पंधरा दिवसांत सर्वच रुग्णालयांतून रक्ताची मागणी वाढली होती. त्यामुळे कोल्हापूरसह पुणे, मुंबईत रक्ताची टंचाई भासू लागली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन केले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
शिवसेनेसह इतर सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिरे घेतली. त्यात शिवराज्याभिषेक सोहळा शिवभक्तांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून साजरा केला. त्यामुळे गेले आठ-दहा दिवसांत सर्वच रक्तपेढ्यात रक्ताची आवक मोठ्या प्रमाणात झाली. रक्त आता ठेवायला जागा नसल्याने शिबिरे नाकारली जात आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजनाच्या सूचना वरिष्ठाकडून दिल्या असल्यातरी आता रक्तपेढ्याच रक्त घ्यायला तयार नाहीत.
जुलैमध्ये रक्ताच्या मागणीत वाढ शक्य
पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीचे आजार डोके वर काढतात. आताच जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. जुलैमध्ये त्याचा फैलाव झाला तर रक्त घटकांची गरज भासणार आहे. त्यावेळी रक्ताची मागणी आणि पुरवठा सुरळीत ठेवावा लागणार आहे.
असा आहे रक्तपेढ्यातील साठा (पिशवी)
रक्तपेढी साठा
- सीपीआर ५६
- महापालिका ८३
- शाहू २२१
- जीवनधारा ५४१
- तुळशी (उदगाव) ३४०
- अर्पण ६४४
- वैभवलक्ष्मी ४९३
- गडहिंग्लज ३२६
- लाईन्स (इचलकरंजी) ९२
- डी. वाय. पाटील ७४
- आधार ९१
- संजीवनी ४५१
- एकूण ३९२२
विशिष्ट कालावधीपर्यंतच रक्ताचा साठा करता येतो. त्यानंतर ते खराब होते. त्यामुळे सध्या रक्तदान संकलन बंद केले आहे. आणखी पंधरा दिवसांनी रक्ताची गरज भासणार आहे, त्यासाठी रक्तदात्यांनी शासनाच्या लिंकवर जाऊन नोंदणी करावी.
- दीपा शिपूरकर,
रक्तसंकलन समन्वय अधिकारी, कोल्हापूर.