संभाजीनगर परिसरातील वसाहतमधील तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2017 06:16 PM2017-04-27T18:16:03+5:302017-04-27T18:16:03+5:30
गजानन महाराजनगरमधील घटना : संशयित श्रीराम कोगनुळीकर कुटुंबासह पसार
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ : मित्राला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यास गेलेल्या संभाजीनगर येथील वारे वसाहतीमधील तरुणाचा खून झाल्याची घटना गजानन महाराजनगर येथील स्वाती विहार अपार्टमेंटमध्ये बुधवारी (दि. २६) रात्री घडली. अमित सुनील दावणे (वय २३, रा. वारे वसाहत, कोल्हापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी संशयित श्रीराम कोगनुळीकर हा कुटुंबासह पसार झाला आहे. याबाबतची फिर्याद सागर आनंदराव टिपुगडे (वय ३२, रा. स्वाती विहार अपार्टमेंट, एफ ८, दुसरा मजला) यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, स्वाती विहार अपार्टमेंटमधील एस विंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर श्रीराम कोगनुळीकर राहतो; तर दुसऱ्या बाजूला एफ-८ मध्ये सागर टिपुगडे राहतो. पूर्ववैमनस्यातून श्रीराम कोगनुळीकर व सागर टिपुगडे यांच्यात वाद आहे. बुधवारी (दि. २६) या दोघा कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादातून श्रीराम कोगनुळीकर यांचा मुलगा पार्थ याला टिपुगडेने शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर पार्थ कोगनुळीकर याने जुना राजवाडा पोलिसांत टिपुगडे यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार टिपुगडेवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.
आपल्याविरोधात तक्रार दिल्याचे समजताच सागर टिपुगडे व त्याचा मित्र अमित दावणे हे दोघेजण श्रीराम कोगनुळीकर याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. यावेळी ‘तुम्ही टिपुगडे यांना का मारले?’असा जाब अमित दावणेने श्रीराम कोगनुळीकरला विचारला. त्यावर ‘तू कोण विचारणार?’ असे म्हणून त्याच्या छातीवर हाताने दणका मारून त्याला सुमारे ६० फूट खाली ढकलून दिले. यामध्ये अमित दावणे हा वाहनतळ मजल्यात पडून गंभीररीत्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित श्रीराम कोगनुळीकर व त्याचे कुटुंबीय पसार झाले. हा प्रकार समजताच पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील पंचनामा केला. या प्रकरणी संशयित श्रीराम कोगनुळीकर याच्यावर खुनाचा दाखल झाला असून, शोध त्याचा पोलिस घेत आहेत. याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे करीत आहेत.
अमित मर्दानी खेळाचा प्रशिक्षक.
अमित दावणेच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. आई उषा या भवानी मंडपात खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर कामास आहेत, तर बहीण उच्चशिक्षित आहे. अमित हा मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक शिकवितो, तसेच तो पडेल ते काम करीत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने मिरजकर तिकटी येथे शिवजयंतीनिमित्त मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके केली होती, तर पुण्यात शिवजयंतीनिमित्त त्याचा आज, शुक्रवारी कार्यक्रम होता.
टिपुगडेच्या घरावर हल्ल्याची चर्चा
कोगनुळीकर व टिपुगडे कुटुंबीय यांच्यात वाद आहेत. बुधवारी (दि. २६) वाद झाला. त्यामुळे कोगनुळीकरने टिपुगडेच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर टिपुगडेने त्याला प्रत्युत्तर देत कोगनुळीकरला व त्याच्या मुलाला शिवीगाळ करून दमदाटी केली असल्याची चर्चा स्वाती विहार अपार्टमेंटमध्ये गुरुवारी होती.
टिपुगडे सलून व्यावसायिक, कोगनुळीकर मॅनेजर
सागर टिपुगडे याचे मंगळवार पेठ, नंगीवली चौकात सलून दुकान आहे; तर संशयित श्रीराम कोगनुळीकर हा एका पत्त्याच्या क्लबवर व्यवस्थापक असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. टिपुगडे हा गायब असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.