दानोळीत तरुणाचा निर्घृण खून
By admin | Published: March 27, 2017 01:08 AM2017-03-27T01:08:42+5:302017-03-27T01:08:42+5:30
दानोळीत तरुणाचा निर्घृण खून
दानोळी : पूर्ववैमनस्यातून रविवारी रात्री दानोळी (ता. शिरोळ) येथे साडे -दहाच्या सुमारास तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. इसाअली गुलाब मुजावर (वय २३) असे मृताचे नाव आहे. घटना दानोळी-निमशिरगाव मार्गावर घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील दानोळी-निमशिरगाव रस्त्यालगत असणाऱ्या लेंडीग्रे तळ्याशेजारी गायरानात इसाअली हा मुरूम भरत होता. त्यावेळी अज्ञात पाच ते सातजणांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. वार वर्मी लागल्याने इसाअली जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असणारा वैभव कुमार मंडले हा किरकोळ जखमी झाला आहे. या हल्ल्याची माहिती वैभवने गावात सांगितली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. गेल्या मंगळवारी दानोळी येथील यात्रा झाली. यानिमित्त रविवारी गावात महिलांसाठी कलापथकाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख दिनेश बारी, उपविभागीय पोलिस अधीक्षक रमेश सरवदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके, जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे दत्तात्रय कदम, कुरुंदवाडचे सहायक पोलिस निरीक्षक कुमार कदम, हातकणंगलेचे सहायक पोलिस निरीक्षक भालके, शिरोळचे गायकवाड यांनी पंचनामा केला. रात्री साडेबाराच्या दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या खून सत्राने गावासह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, मोठा पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)
खूनसत्र सुरूच...
१७ मार्च २०१२ रोजी दानोळीतील यात्रेत युवकाच्या दोन गटांत वाद झाला होता. त्यावेळी उत्तम संभाजी थोरात या युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी हैदरअली गुलाब मुजावर आणि इसाअली गुलाब मुजावर या दोघा भावांवर आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान, थोरात समर्थकांनी मुजावर कुटुंबीयांची घरे पेटवली होती.