तरुणाचा २३ वार करून निर्घृण खून
By admin | Published: January 3, 2015 12:51 AM2015-01-03T00:51:00+5:302015-01-03T00:53:05+5:30
दोघांना अटक : खोतवाडीत प्रेमप्रकरणातून घटना
इचलकरंजी/यड्राव : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील भरचौकात दिवसाढवळ्या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. सूरज अतुल भांबुरे (वय १९, रा. खोतवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर चाकूने २३ वार करण्यात आले आहेत.
जमावाने मारेकरी बिट्या ऊर्फ परवेज निसार मणेर (१९) याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. प्रेमप्रकरणातून गेले वर्षभर दोघांत वादावादी सुरू होती, तर दोन दिवसांपासून व्हॉटस् अॅपवरून एकमेकास शिवीगाळ सुरू होती. त्यातूनच हा खून झाला आहे, असे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अक्षय खांडेकर याला ताब्यात घेतले असून, अन्य दोघेजण फरारी आहेत.
याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सूरज व परवेज हे दोघे शालेय जीवनापासून एकत्रित शिकत होते. सूरज महाविद्यालयीन शिक्षण घेत सीएनसीवर पार्वती औद्योगिक वसाहतीत काम करीत होता, तर परवेज हा खोतवाडीतील एका सायकल दुकानात काम करीत होता. दोघांत २६ जानेवारी २०१४ रोजी प्रेमप्रकरणावरून वाद झाला होता. त्यावेळीपासून त्यांच्यात खुन्नस सुरू होती. त्यांच्यात गेल्या दोन दिवसांपासूनही व्हॉटस् अॅपवरून अश्लील मेसेज पाठविणे व शिवीगाळ यावरून वाद सुरू होता.
आज, शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास परवेजने सूरजला फोन करून घरातून बाहेर बोलावले. तो बाहेर येताच परवेजने त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चौकाच्या दिशेने सूरज पळत सुटला.
पाठलाग करून तिघा मित्रांनी त्याला पकडले आणि पुन्हा परवेजने सूरजच्या पोटावर, छातीवर, तोंडावर असे एकूण २३ वार केले. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सूरज जाग्यावरच कोसळला. भरचौकात घटना घडल्याने चौकातील नागरिकांनी परवेज याला पकडून ठेवले. तर सूरजच्या शेजारचा मित्र बबन एकनाथ खोत याने सूरजला रिक्षातून उपचारासाठी म्हणून खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सूरजच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ आहेत. नातेवाईकांनी आयजीएम रुग्णालयात मोठा आक्रोश केला. दरम्यान, परवेज याला पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख मानसिंग खोचे यांच्या ताब्यात दिले. खोचे यांनी पथकासह आयजीएम रुग्णालय व घटनास्थळाची पाहणी करून परवेजची कसून चौकशी केली.
चौकशीत परवेजने प्रेमप्रकरणातून आपण हा खून केला असल्याचे कबूल केले. दरम्यान, या प्रकरणात परवेजसोबत आणखीन तीन साथीदार असल्याचे समजल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यातील अक्षय खांडेकर हा पोलिसांच्या हाती लागला. मात्र, सद्दाम नदाफ, इब्राहीम बाडकर हे दोघे फरार झाले. याबाबत शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश पवार व मानसिंग खोचे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नेमकी माहिती देण्याचे टाळले. (प्रतिनिधी)
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
मृत सूरजच्या अंत्यविधीवेळी पोलीस निरीक्षक सतीश पवार व त्यांचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख मानसिंग खोचे व त्यांचे पथक असा पोलीस बंदोबस्त होता.
त्याचबरोबर बंदोबस्तासाठी दोन पोलीस पथके नियुक्त करण्यात आली होती. मारेकरी व आरोपी एकाच गावातील असल्यामुळे बंदोबस्त ठेवल्याचे सांगितले जात आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
सूरजच्या खूनप्रकरणी पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीमध्ये तफावत असून, याबाबतची नेमकी माहिती पोलीस निरीक्षक सतीश पवार व मानसिंग खोचे यांनी रात्री उशिरापर्यंत पत्रकारांना दिली नाही. त्यामुळे नेमका घटनाक्रम कळू
शकला नाही.