गणेश मंडळांचे फलक, देखावे ठरले लक्षवेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2016 12:23 AM2016-09-17T00:23:01+5:302016-09-17T00:31:27+5:30
विसर्जन मिरवणूक : खंडपीठापासून पर्यावरणापर्यंत विविध प्रश्न मांडण्याचा प्रयत्न, सजीव देखाव्यांची प्रभावी मांडणी
कोल्हापूर : शहर ते देश पातळीवरील सामाजिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याची परंपरा जोपासलेल्या गणेश मंडळांनी याहीवर्षी लक्षवेधी फलक व देखाव्यांची परंपरा कायम राखली. कोल्हापूरच्या खंडपीठापासून ते मराठा क्रांती मोर्चापर्यंत आणि पर्यावरण जपण्यापासून ते ‘लेक वाचवा’पर्यंतचे संदेश फलक या मिरवणुकीमध्ये झळकले. अचूक शब्दरचना आणि नेमका संदेश देणाऱ्या या फलकांनी कोल्हापूरचे प्रश्नही पुन्हा एकदा नेमकेपणाने मांडले.
के.एम.टी.कर्मचारी संघटनेचा गणपती बसवरून नेण्यात आला. बसवर सर्वत्र ‘जलसंवर्धन अभियानात सहभागी व्हा’, ‘झाडे लावा-झाडे जगवा’, ‘आई पाहिजे-बायको पाहिजे- मग मुलगी का नको?’ असे फलक होते. शहाजी वसाहत येथील शहाजी तरुण मंडळाने लहान मुलींनी हातात घेतलेले ‘कोल्हापूरला खंडपीठ झालेच पाहिजे’, ‘अवयव दान, रक्तदान श्रेष्ठ दान’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे’, आदी सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे हे फलक मिरवणुकीचे लक्ष वेधणारे ठरले.
शिवाजी पेठेतील शतकोत्तर परंपरा असलेल्या सरदार तालीम मंडळाने राजकीय नेत्यांना संदेश दिला. ‘चला कोल्हापूर बदलूया, विकासकामांसाठी एक होऊ या’अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांच्या हातात तसेच वाहनांवर लावण्यात आले होते. शिवाजी पेठेतील झुंजार क्लबने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मिरवणुकीत प्रभावीपणे मांडला. ‘कसली आर्ची, कसला परशा, भारतात फक्त मराठ्यांची चर्चा’, ‘यमाईला मीठ-पीठ, कोल्हापूरला खंडपीठ’, ‘आजवर लढलो सर्वांसाठी, आता लढा मराठ्यांच्या अस्मितेसाठी’, ‘आज नाही तर कधीच नाही’, ‘आम्ही लढलो मातीसाठी, एक लढा जातीसाठी’, अशी वाक्ये असलेले फलक मोठ्या वाहनांवर लावण्यात आले होते. ‘कोल्हापूरला खंडपीठ झालेच पाहिजे’ ही मागणी करणारा देखावाही क्लबने सादर केला.
न्यू शाहूपुरीतील नवयुवा क्रीडा मंडळाने ‘ड्रेनेजच्या पाण्यात बसणारा एकमेव गणपती’, असा फलक लावून महापालिकेच्या मानाच्या नारळावर बहिष्कार घालत असल्याचा फलक लावला होता. दौलतनगर येथील भगतसिंग मित्रमंडळाने ‘खाकी वर्दी का दर्द’ असा फलक लावून पोलिसांशी सौजन्याने वागण्याचे आवाहन केले.
दरवर्षी मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान मिळविणाऱ्या मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीम मंडळाने यंदाही हा मान कायम ठेवला. खासबाग मैदान येथून पापाची तिकटी येथेपर्यंत यायला मंडळा दोन तास लागले. प्रत्येकवर्षी साधेपणाने मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या या मंडळाने यंदा महालक्ष्मी प्रतिष्ठानचे ढोल-ताशा पथकाच्या सहायातून मिरवणुकीला वेगळी प्रतिष्ठा दिली. मराठी संस्कृ तीची परंपरा अधोरेखित करणारी वासुदेव, गोंधळी, कडकलक्ष्मी, बहुरूपी, आदी सजीव पात्रे मिरवणुकीत आणली होती.
शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या संभाजीनगर येथील संभाजीनगर तरुण मंडळाचा गणपती गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता संभाजीनगर येथून विसर्जनासाठी नेण्यात आला. मंडळाने आणलेल्या धनगरी ढोल पथकाने अतिशय लयबद्ध ठेका धरत वेगळेपण जपले.
रविवार पेठेतील दिलबहार तालीम मंडळाचा ‘दख्खनचा राजा’ रूपातील आकर्षक गणेशमूर्तीसमोर मिरवणुकीत अखंडपणे गुलालाची उधळण केली जात होती. कार्यकर्तेही गुलालात न्हाऊन गेले होते. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजरही मिरवणूक मार्गावर झाला.
प्रत्येकवर्षी काहीतरी नावीन्य निर्माण करणाऱ्या मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी मिरवणुकीत मुलींना निर्भय बनण्याचा सल्ला देणारा सजीव देखावा सादर केला. महाविद्यालयीन तरुणी रस्त्यावरून जात असताना त्यांची छेडछाड करणाऱ्या तरुणांचा बंदोबस्त कसा करावा, हेच या देखाव्यांतून कार्यकर्त्यांनी मांडले.
लक्ष्मीपुरीतील स्वयंभू गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही अत्यंत शिस्तबद्धपणे मिरवणुकीत सहभाग घेतला. मंडळाच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी गुलाबी फेटे बांधले होते. रंकाळावेस येथील गोल सर्कलच्या ‘कोल्हापूरच्या राजा’ने आपले वेगळेपण जपले. लालबागच्या राजाच्या स्वरूपातील या गणेशमूर्ती पुढे ‘करवीर नाद’ ढोल पथकाने लयबद्ध तालात सुंदर अशी प्रात्यक्षिके सादर करुन मने जिंकली. बालगोपाल तालीम मंडळानेही ‘करवीर गर्जना’ हे ढोल पथक मिरवणुकीत आणले होते.
शिवाजी पेठेतील नाथा गोळे तालीम मंडळाच्या गणेशमूर्तीची मिरवणूक पालखीतून काढण्यात आली. मंडळाच्या सुमारे पाचशे कार्यकर्त्यांनी पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या. जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळाची मूर्तीही पालखीतून विसर्जनास नेण्यात आली. शिवाजी पेठेतील निवृत्ती तरुण मंडळाच्या महिलांनी झिम्मा-फुगडीचे खेळ खेळले. फेर गौराईच्या गाण्याच्या तालावर नृत्यही केले.
शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपली गणेशमूर्ती शिस्तबद्धपणे विसर्जनासाठी नेली. कार्यकर्त्यांनी पांढरे शुभ्र कपडे परिधान केले होते. ‘शिवस्वराज्य’ ढोल पथकाने मिरवणुकीतील वेगळपण जपले. लयबद्ध, एकसाथ, ठेक्यात नाद निर्माण केला. तोरस्कर चौकातील सोल्जर्स ग्रुपने राष्ट्रीय एकात्मता विषयावर सजीव देखावा सादर केला होता. छत्रपती शिवाजी, शाहू महाराज व महात्मा गांधी यांच्या वेशातील पात्रे हा संदेश देत होती. वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणारा देखावा सादर केला.
शाहूपुरी व्यापारपेठेतील शाहूपुरी युवक मंडळाची ‘पंढरीची वारी’ व ‘रिंगण सोहळा’ मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. एक मोठ्या ट्रकवर वारकरी, अश्व साकारले होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांचा वेश धारण केला होता. डोकीवर पांढरी टोपी परिधान केली होती. लेटेस्ट तरुण मंडळाने ‘गंगावतरण’ हा गंगा ते पंचगंगा हा देखावा सादर केला होता. मूर्तीसमोर तांबडा फेटा, धोतर आणि पांढरा नेहरू शर्ट घातलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. ढोलपथकाने जांभळा शर्ट, धोतर परिधान केले होते.
महापालिकेतर्फे ३३० मंडळांना श्रीफळ, रोपे
महापालिकेच्यावतीने अनंत चतुदर्शीनिमित्त सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी येथील मंडपामध्ये महापौर अश्विनी रामाणे, आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, सभागृह नेता प्रवीण केसरकर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त विजय खोराटे, ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी यांच्या हस्ते ३३० मंडळांना श्रीफळ, पानसुपारी दिली. वृक्षारोपणाचे महत्त्व जपण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना रोप भेट देण्यात आली.
२८ वर्षे पाणीपुरवठा
लायन्स क्लब राजारामपुरी तर्फे गेली २८ वर्षे मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिरामध्ये शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येते. अध्यक्ष दत्तात्रय नकाते व संतोष पंडित यांच्यासह कार्यकर्ते ही सेवा देत होते. अंधशाळेच्या परिसरात स्पर्श फाऊंडेशनचा पाणीपुरवठा सुरू होता.
पोलिसांना भेळ
महालक्ष्मी बँकेचे कर्मचारी रवींद्र कवठेकर व त्यांच्या पत्नी रेखा गेली १५ वर्षे पंचगंगा नदीवरील १०० पोलिसांना भेळ देण्याचा उपक्रम राबवितात. रेखा यांचे वडील पोलिस दलात कार्यरत होते. त्यांच्या स्मृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.
पोलिस व ढोल-ताशा
‘पीटीएम’ने बुधवारी रात्री ११ च्या सुमारास मिरजकर तिकटी येथे प्रवेश केला होता. गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास म्हणजे बरोबर २४ तासांनी त्यांचा गणपती बिनखांबीजवळ आला. ‘पीटीएम’ने पिवळा टी-शर्ट घातलेले ढोल-ताशा पथकही सोबत आणले होते. संध्याकाळनंतर डॉल्बीचे टेस्टिंग सुरू झाले. जेव्हा जेव्हा डॉल्बीचा आवाज येत असे, तेव्हा पोलिस धाव घेत. त्यावेळी ‘पीटीएम’च्या ढोलताशांचा दणदणाट सुरू होई.