गडहिंग्लज कारखान्यावर प्रशासकीय मंडळ, पदभार स्विकारला; अरुण काकडे, अमर शिंदेंसह तिघांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 12:48 PM2022-02-04T12:48:37+5:302022-02-04T12:49:13+5:30
गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अंतर्गत राजकारणामुळे १२ संचालकांनी अचानक राजीनामे दिले होते.
कोल्हापूर : गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवड गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती केली. विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्यासह तिघांचा प्रशासकीय मंडळात समावेश केला असून त्यांनी आज, शुक्रवारी सकाळी कारखाना व्यवस्थापनाचा पदभार स्विकारला.
गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अंतर्गत राजकारणामुळे १२ संचालकांनी अचानक राजीनामे दिले होते. राजीनामे देत साखर विक्रीसह इतर व्यवहारावर निर्बंध आणण्याची मागणीही त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. एस. एन. जाधव यांच्याकडे केली होती.
डॉ. जाधव यांनी त्याच दिवशी साखर विक्री रोखण्याबाबत आदेश काढले होते व संचालक मंडळ अल्पमतात आल्याने कारखान्यावर प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक का करू नये? असा नोटीस सहसंचालकांनी कारखाना व्यवस्थापनाला बजावला होता.
दरम्यान, कारखान्यावर गुरुवारी प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी अरुण काकडे यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यी मंडळाने पदभार स्विकारला. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत वर्षापुर्वी संपलेली आहे.