Kolhapur: दूधगंगा नदीत बुडालेल्या निपाणी येथील दोघा पर्यटकांचे मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:35 PM2024-07-02T12:35:44+5:302024-07-02T12:38:39+5:30
संततधार पावसात एनडीआरएफ'च्या पथकाची शोध मोहीम सुरू होती
गौरव सांगावकर
राधानगरी : काळम्मावाडी येथे दूधगंगा नदीत बुडालेल्या दोघा पर्यटकांचे मृतदेह सापडले. वर्षा पर्यटनाला आलेले निपाणी येथील प्रतिक संजय पाटील व गणेश चंद्रकांत कदम हे धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात बुडाले होते. आज, मंगळवारी एनडीआरएफ'च्या टीमला रेस्क्यू करताना त्यांचा मृतदेह हाती लागला. आज सकाळपासूनच संततधार पावसात शोध मोहीम सुरू होती.
सकाळी ११ वाजता प्रतीक पाटील तर दुपारी १२च्या सुमारास गणेश कदम यांचा मृतदेह एनडीआरएफ'च्या रेस्क्यू टीमला सापडला घटनास्थळी राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय खंडू गायकवाड या शोधमोहीमेत सहभागी झाले होते. दोन महिन्यातील ही दुसरी घटना असून वर्षा पर्यटनाचा आनंद पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावे.
वाचवायला गेला अन् दोघेही बुडाले
गणेश कदम हा युवक पोहता येत नसताना काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेला गाडी चालक यांने डोहात उडी घेऊन गणेश पर्यंत पोहचला. पण गणेशने प्रतीक याला मिट्टी मारल्याने दोघेही बुडाले.