उद्योजक अमर डोंगरे यांचा मृतदेह पंचगंगा नदीपात्रात आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:44+5:302020-12-23T04:22:44+5:30
इचलकरंजी : येथील वर्धमान हौसिंग सोसायटी परिसरातील उद्योजक अमर श्रीधर डोंगरे (वय ५५) यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी पंचगंगा नदीपात्रात ...
इचलकरंजी : येथील वर्धमान हौसिंग सोसायटी परिसरातील उद्योजक अमर श्रीधर डोंगरे (वय ५५) यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी पंचगंगा नदीपात्रात आढळला. जीवनमुक्ती संस्थेच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.
याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, डोंगरे हे सोमवारी (दि. २१) बेपत्ता झाले होते. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली. नातेवाइकांसह पोलीसही त्यांचा शोध घेत होते. सोमवारी सायंकाळी त्यांची मोटारसायकल पंचगंगा नदीघाटावरील वरद-विनायक मंदिराजवळ सापडली होती. त्यामुळे डोंगरे यांनी नदीत उडी टाकून आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त होत होती. त्यानुसार रात्री नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. परंतु अंधारामुळे अडथळा येत असल्याने शोध थांबला होता. मंगळवारी सकाळी पुन्हा नदीपात्रात शोध घेतला असता कट्टीमोळा डोहजवळ त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे शहरातील विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.
चौकट
वस्त्रोद्योग क्षेत्रात खळबळ
वीस दिवसांपूर्वी शहरातील जावळे नामक उद्योजकाने रुई धरणावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. आर्थिक कारणातून त्यांना त्रास देणाऱ्यांची नावे सुसाईड नोटमध्ये नमूद असतानाही अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा आर्थिक विवंचनेतून उद्योजकाची आत्महत्या झाल्याने वस्त्रोद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
२२१२२०२०-आयसीएच-११ (अमर डोंगरे)