प्रणालीचा मृतदेह पंचगंगा नदीत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:30 AM2021-08-25T04:30:16+5:302021-08-25T04:30:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : यळगुड (ता. हातकणंगले) येथील बेपत्ता असलेल्या प्रणाली युवराज साळुंखे या नऊ वर्षीय मुलीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : यळगुड (ता. हातकणंगले) येथील बेपत्ता असलेल्या प्रणाली युवराज साळुंखे या नऊ वर्षीय मुलीचा मृतदेह इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्रात मंगळवारी सकाळी आढळला. त्यामुळे प्रणालीच्या निर्दयी सावत्र बापानेच तिचा घात केल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, शवविच्छेदनासाठी प्रणालीचा मृतदेह आयजीएम रुग्णालयात नेल्यानंतर तेथे प्रणालीच्या आईसह नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला.
त्यावेळी मूळ वडिलांच्या नातेवाइकांसह सावत्र नातेवाइकांच्यात प्रणालीचे तोंड पाहण्याच्या कारणावरून जोरदार वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना बाजूला केले. त्यावेळी रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
प्रणाली बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी (दि. २२) हुपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तेथून या प्रकरणाचा तपास सुरू झाला. तपासावेळी सोबत असणारा सावत्र बाप युवराज आत्माराम साळुंखे (वय ३९, रा. श्रीराम मंदिरासमोर, यळगुड) याच्यावर पोलिसांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने प्रणालीला इचलकरंजीतील पंचगंगा नदीमध्ये ढकलल्याचे कबूल केले.
त्यावेळेपासून दोन बोटींच्या साहाय्याने इचलकरंजीतील आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शोध सुरू होता. परंतु रात्री उशिरा अंधारामुळे शोधकार्य थांबवले होते.
हुपरी व शिवाजीनगर पोलिसांनी दोन बोटींच्या साहाय्याने रविवारी सकाळी सहा वाजता पुन्हा शोधकार्य सुरू केले. दहा वाजता पोलीस व रेस्क्यू फोर्सला पंचगंगा नदी पुलापासून दोन किलोमीटर खाली शिरदवाड (ता. शिरोळ) हद्दीत प्रणालीचा मृतदेह आढळला. त्यावेळी नदी घाटावर नातेवाइकांनी आक्रोश केला. पथकाने तेथून मृतदेह बाहेर काढून आयजीएम हॉस्पिटलमध्ये विच्छेदनासाठी आणला. तेथे तिचे मूळ वडील व त्यांचे नातेवाइक जमले होते. त्या ठिकाणी सावत्र वडिलाचे नातेवाइक आल्यानंतर दोघांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी व वादावादी झाली. मुलीला पाहायचे आहे, असा हट्ट मूळ वडिलाच्या नातेवाइकांनी धरला होता. त्यामुळे हॉस्पिटल परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी भेट दिली.
फोटो ओळी
२४०८२०२१-आयसीएच-०४
प्रणालीच्या आईचा आयजीएम हॉस्पिटलमधील आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
छाया-उत्तम पाटील
२४०८२०२१-आयसीएच-०८
पंचगंगा नदीघाटावर प्रणालीचा शोध घेत असताना शोध पथकाला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.