चांदे बंधाऱ्यावरून पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 09:39 PM2019-06-29T21:39:40+5:302019-06-29T21:41:00+5:30
चांदे-मांजरवाडी दरम्यानच्या संरक्षक कठडे नसलेल्या बंधाऱ्यावरून पडून नदीत बुडालेल्या चांदे (ता. राधानगरी) येथील शिक्षकाचा मृतदेह शनिवारी तुळशी नदीत मिळाला.
धामोड : चांदे-मांजरवाडी दरम्यानच्या संरक्षक कठडे नसलेल्या बंधाऱ्यावरून पडून नदीत बुडालेल्या चांदे (ता. राधानगरी) येथील शिक्षकाचा मृतदेह शनिवारी तुळशी नदीत मिळाला. आण्णाप्पा आप्पाण्णा रोगे (वय ४९) असे त्यांचे नाव आहे. अपघाताची घटना बुधवारी (दि. २७) सायंकाळी घडली होती.
दरम्यान, संरक्षक कठड्याची वारंवार मागणी करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली असल्याचे स्थानिकांनी बोलून दाखवले. या पुलावरून पडून मृत्युमुखी होण्याची ही दुसरी घटना आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी की, आण्णाप्पा रोगे हे गर्जन (ता. करवीर) येथील शाळेत अध्यापनाचे काम करतात. बुधवारी सायंकाळी शाळेतून घरी परतत होते. मांजरवाडी -चांदे दरम्यानच्या बंधाºयावर आले. या बंधाºयावर मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साठले आहे. या खड्ड्यात जाऊन त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यातच संरक्षक कठडे नसल्याने रोगे यांची दुचाकी बंधाºयावरून खाली कोसळली. दरम्यान, सायंकाळी ते घरी न आल्याने पत्नीने शोधाशोध केली; परंतु संपर्क झाला नाही. शोध सुरू असतानाच शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह चांदे -मांजरवाडी बंधाºयाच्या तुळशी नदीच्या डोहात तरंगताना ग्रामस्थांना आढळला, तर त्याच ठिकाणी त्यांची दुचाकी गाडीही मिळाली.
चांदेचे पोलीसपाटील शशिकांत खाडे यांनी याबाबतची वर्दी राधानगरी पोलिसांत दिली. मृतदेह आण्णाप्पा रोगे यांचाच असल्याची ओळख पटल्यावर सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी चांदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार असून त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.