कोल्हापुरातून बोइंग, जेट विमाने लवकरच झेपावणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:25 PM2024-03-11T12:25:48+5:302024-03-11T12:27:07+5:30
'विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करू'
कोल्हापूर : कोल्हापूरच्याविमानतळावरून लवकरच बाेइंग आणि जेट विमानांचे उड्डाण होईल. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम किंवा व्हीजीएममधून या विमानतळाला कनेक्टिव्हिटी मिळेल, यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कोल्हापूर विमानतळावर दिली. कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवेला ३१ मार्चपासून प्रारंभ होईल, अशी गुड न्यूजही या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनल भवनाचे लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. उत्तर प्रदेशातील आझमगड येथून त्यांनी देशातील ३४ हजार कोटी रुपयांच्या विमानतळ, महामार्ग आणि रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यास केला. या समारंभानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापूरच्या विमानतळाचा लूक हा ऐतिहासिक, हेरिटेज आणि आयकॉनिक झाला आहे. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी मी पाठपुरावा करेन.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याच्या प्रस्तावावरही आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करू.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, विमानतळ प्राधिकरणाचे पीयूष श्रीवास्तव, प्रकल्प संचालक दिलीप सजनानी, के.डी. दास, विमानतळ व्यवस्थापक अनिल शिंदे उपस्थित होते.
टर्मिनलची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विमानतळाच्या इमारतीची बारकाईने पाहणी केली. हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल असे सांगून त्यांनी कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळाला शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूरचं नवं आकर्षण.. हेरिटेज लूकचं विमानतळ
कोल्हापूरच्या ऐतिहासिक पाऊलखुणा, परंपरेला साजेसा असा ऐतिहासिक हेरिटेज लूक कोल्हापूरच्या विमानतळाला देण्यात आला. विमानतळात जाणाऱ्या प्रवासी कक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबाराचे भव्य असे तैलचित्र प्रवासी दालनात संपूर्ण भिंतीवरच रेखाटले आहे. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि करवीरच्या संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांचीही तैलचित्रे विमानतळावर रेखाटली आहेत. या इमारतीत कोल्हापूरच्या वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्याचे दर्शन नागरिकांना घडले.
नागरिकांना करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा यांचे दर्शन घडले. बँग्ज क्लेम रूममध्ये अंबाबाई आणि जोतिबाच्या भव्य प्रतिमा पाहून नागरिक भारावून गेले. ऐतिहासिक रंकाळा, किल्ले पन्हाळा, शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले खिद्रापूरचे मंदिर अशा कोल्हापूरच्या पर्यटनाचे दर्शन घडविणाऱ्या कलाकृती नागरिकांनी मोबाइलमध्ये बद्ध केल्या.